डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ने जमा केले तब्बल 5 टन निर्माल्य...





शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
 



गणेशोत्सवात भक्तांच्या कडून गणपतीला दुर्वा,फुले वाहिली जातात. फुलांचे मोठे मोठे हार गणपतीला घातले जातात. मोठमोठी थर्माकोलची, प्लास्टिकची आरास गणपती भोवती केली जाते आणि हे सर्व विसर्जनाच्या वेळेस नदीत विसर्जित केले जाते.






एवढ्या मोठ्या प्रमाणात हे निर्माल्य नदीत जाऊन नदी प्रदूषण होऊ नये, यासाठी डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मु.पो. रेवदंडा, ता.अलिबाग, जि. रायगड यांचे मार्फत उदगाव अंकली टोलनाका येथे प्रतिष्ठानच्या 125 सदस्यांमार्फत 2 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते  रात्री 10 वाजेपर्यंत 5 पाच टन निर्माल्य जमा करण्यात आले. या कार्यामध्ये उदगाव ग्रामपंचायतचे कर्मचारी, तसेच डॉक्टर जे.जे.मगदूम फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदवला होता. 







डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत नेहमीच सामाजिक बांधिलकी आणि समाज ऋणांची जाणीव ठेवून कार्यक्रम राबवले जातात. त्यापैकीच एक म्हणजे निर्माल्य संकलन. यामध्ये निर्माण फक्त गोळा केले जात नाही तर, त्याचे विलगीकरण करण्यात येते. त्यातील दोरा,प्लास्टिक, थर्माकोल व इतर कचरा वेगळा करून मूळ निर्माल्य वेगळे केले जाते. सदर निर्माल्य पासून कंपोस्ट खत तयार करून ते प्रतिष्ठान मार्फत लागवड केलेल्या झाडांना वापरण्यात येते . या उपक्रमामुळे नदी, तलाव, विहिरी यामध्ये पाण्याचे प्रदूषण भरपूर प्रमाणात कमी होते. तसेच यापासून निर्माण होणारे खत हे जैविक असल्यामुळे जमिनीचा कस ही टिकून राहतो. 








या उपक्रमाबरोबरच श्री बैठकीतून निरुपणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन देखील केले जाते. तसेच वृक्षारोपण व संवर्धन, स्वच्छता अभियान, आपत्ती व्यवस्थापन, तलाव-विहिरी-नदीतील गाळ काढणे, बोर-विहिरीचे जल पुनर्भरण, शालेय साहित्य वाटप, आरोग्य शिबिर, पाणपोई, बस थांबा निर्मिती, रक्तदान शिबिर, शोषखड्डा असे अनेक सामाजिक उपक्रम प्रतिष्ठान तर्फे राबवले जातात. हे सर्व उपक्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जातात.



यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती अनिल उर्फ सावकार मादनाईक, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा सौ.नीता माने, जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक श्री. सत्यवान हाके, उदगाव चे सरपंच सलीम पेंढारी, उपसरपंच अरुण कोळी, जयसिंगपूर चे माजी नगरसेवक पराग पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष संदीप पुजारी, जयसिंगपूरचे युवा नेते राहुल पाटील व शिरोळचे युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य पाटील उपस्थित होते.






कमल दिनकर मिरजकर या गौरी गणपती विसर्जन करताना त्यांचे मंगळसूत्र हरविले होते. त्यांचे हे मंगळसूत्र गौरी गणपती विसर्जन करताना त्यासोबतच निर्माल्यात होते.  डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांना निर्माल्य संकलनाच्या वेळेस सदर मंगळसूत्र सापडले. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी हे मंगळसूत्र मिरजकर यांना प्रामाणिकपणे परत केले. एवढ्या मोठ्या किमतीचे मंगळसूत्र परत मिळाल्यामुळे मिरजकर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. त्यांनी प्रतिष्ठानच्या सदस्यांचे आभार मानले.  यावरून डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची शिकवण समाजापुढे आली. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने