शिरोळ प्रतिनिधी : मंगेश नलावडे
जुन्या भांडणाचा वाद मनात धरून परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे (सर्व रा. शिरोळ) या सात जणांनी संगनमताने दगड आणि कोयत्याने हल्ला करून दीपक दशरथ मगदूम (वय २० वर्षे रा. शिवाजीनगर शिरोळ) यास गंभीर जखमी केल्याची फिर्याद अमोल संतोष सावंत यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान उपचार सुरू असताना दीपक मगदूम याचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा नोंद करून, शिरोळ पोलिसांनी सातही संशयितांना अटक केली आहे.
शिरोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे यांचे दीपक मगदूम बरोबर कोणत्यातरी कारणावरून भांडण झाले होते. या जुन्या भांडणाचा वाद मनात धरून परवेज शेख याने दीपक मगदूम यास रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास कुरुंदवाडला जायचं आहे. असे सांगून मोटरसायकलवरून शिरोळ नदीवेस रस्त्यावरील तीन तिकटीजवळील शेताजवळ आले. यावेळी परवेज शेख याने हातात दगड घेऊन मारा रे याला म्हणून दीपक मगदूम याच्या डोक्यात पाठीमागून मारले. यावेळी अमोल सावंत याने परवेज शेख यास बाजूला केले असता, शेख याने अमोल सावंत यांची गळपट धरून हाताने मारहाण करत तुला पण मारीन अशी धमकी दिली. अगोदरच शेतात बसलेले रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील प्रतीक सावंत, विनायक साळुंखे हे त्या ठिकाणी आले. यावेळी प्रज्योत साळोखे यांने अमोल सावंत याचा गळा दाबून तू यामध्ये येऊ नकोस असे म्हणत त्याला बाजूला ओढू लागला.
यावेळी संशयित आरोपी परवेज शेख, ऋषिकेश कांबळे, रोहन कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे या सर्वांनी मिळून दीपक मगदूम यास ओढून घेऊन शेतात नेऊन त्याला दगडाने मारहाण केली. या दरम्यान रोहन कांबळे यांनी कोयत्याने दीपक मगदूम यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर मारहाण केली. यावेळी सर्वजण त्या ठिकाणाहून जात असताना, रोहन कांबळे याने आपल्याजवळील कोयता अमोल सावंत यास दाखवून तुला पण जिवंत सोडणार नाही, तुला नंतर बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर सर्व संशयित आरोपीनी घटनास्थळावरून पलायन केले.
दरम्यान या घटनेची रात्री पोलिसांना माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन जखमी दीपक मगदूम यास तात्काळ मिरज येथील येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्रीपासूनच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला. सोमवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके यांनीही घटनास्थळी भेट दिली. उपचारादरम्यान सोमवारी दीपक मगदूम याचा मृत्यू झाला.
शिरोळ पोलीस ठाण्यात परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे , या सात जणांनी संगनमताने दीपक मगदूम याचा खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर या करित आहेत.
कमी वयाची मुले व्यसनाधीनतेकडे वळल्यामुळेचं अश्या प्रकारच्या घटना घडत आहेत. याला वेळीच आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर येणारे भविष्य भयानक असेल, यात शंका नाही. पोलिसांनीच अमली पदार्थ विकणारे व नशा करणारे यांचा शोध घेऊन, त्यांच्या मुसक्या आवळणे सध्या गरजेचे असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा