" लय अवघड हाय गड्या... उमगाया बाप रं..." शिरोळ मधील बाल गजराज मंडळ च्या सजीव देखाव्यात घडला भावनिक प्रसंग...





शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क 


गेल्या कित्येक वर्षांपासून शिरोळ शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सजीव देखाव्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम करीत आले आहेत. यावर्षीही शिरोळ मधील जवळपास 15 मंडळांनी सजीव देखावे साकारले होते. यामध्ये भाग घेतलेल्या युवकांनी एकापेक्षा एक सरस भूमिका बजावल्या होत्या.



यातीलच आपल्या सजीव देखाव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या बाल गजराज मंडळाने यावर्षी " लय अवघड हाय गड्या... उमगाया बाप रं..." हा वडिलांच्या आपल्या मुलांवर असणाऱ्या प्रेमावर व वडिलांचा त्याग दाखवणारा सजीव देखावा सादर केला होता. या सजीव देखाव्यात मंडळाच्या बऱ्याच युवा व जेष्ठ कलाकारांनी सहभाग घेतला होता.



या देखाव्याचा गुरुवारी शेवटचा प्रयोग झाला. या शेवटच्या प्रयोगाच्या वेळेस एक भावनिक प्रसंग घडून आला. या देखाव्यात सहभाग घेतलेले बाल गजराज परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य आणि उत्कृष्ट कलाकार श्रीयुत बाळासाहेब कोळी (मेस्त्री) यांची लाडकी लेक कुमारी पल्लवी हिने या देखाव्यातील एक उपदेश घेऊन, उस्फुर्तपणे प्रेरणा घेऊन, आपल्या बापावर अफाट प्रेम दाखविणारी, स्वतःच्या कल्पक आणि भावुक अशा सदसद विवेकबुद्धीने, स्वतःच्या प्रगल्भ विचाराने, स्वतः रचलेली कविता या ठिकाणी सादर केली.



ही कविता वाचत असताना बाप बाळासाहेब आणि मुलगी पल्लवी एकमेकांना मिठी मारून रडू लागले आणि असा हा भावनिक प्रसंग पाहून येथे उपस्थित असलेल्या सर्वच प्रेक्षक आणि  बाल गजराज परिवारातील सदस्यांचे डोळे पाणावले. त्यावेळेस एक अविस्मरणीय क्षण प्रत्येकाला अनुभवायला मिळाला....!


कुमारी पल्लवी हिने रचलेली कविता खालील प्रमाणे...


अनमोल असतं प्रेम..... आई आणि बापाचं...

पण जगावेगळं नातं असतं..... बाप आणि लेकीचं......!

लेक काय म्हणते पहा......

बाबा तुमच्याशिवाय जग मला नाही बघायचं...

तुमच्या कुशीतच मला राहू दे.. माझ्या बाबापासून दूर मला नाही राहायचं...!

शिकवलं तुम्ही मला बोट धरून... कसं जगाकडे पाहायचं..

तुमच्याकडे बघून कळालं कसं असतं जगायचं...!

जगण कधीच नसावं.. पाणी विना माशांचं...

तसंच असतं नातं.. बापाविना लेकीचं....!

तुमच्याकडूनच शिकलं पाहिजे... दुःख लपून कसं हसायचं...

त्याच हसूनं खुलत.. आयुष्य बापाच्या लेकीच...

बाबा तुमच्याशिवाय जग मला नाही बघायचं....!

तुमच्या कुशीतच मला राहू दे...  माझ्या बाबा पासून दूर मला नाही राहायचं....

तुम्हीच एक कारण आहात .... आनंदी माझ्या जगण्याचं...!

तुमच्यासारखा बाप मिळणं... सार्थक माझ्या आयुष्याचं..

माफ करा मला...🙏तुम्हाला कधीच नसतं दुखवायचं...

मनात मात्र नेहमी असतं... मीच असावं कारण तुमच्या प्रत्येक हसण्याचं...!

शेवटी एकच सांगते.... कोणतेही दुःख नको कधीच तुमच्या वाट्याला...

 गणराया चरणी एकच मनोकामना ... माझे आयुष्य लाभो तुम्हाला...!

हाच बाप मिळू दे...प्रत्येक जन्मी माझ्या आयुष्यासाठी....

ही कविता माझी...बाबा.. फक्त आणि फक्त...तुमच्यासाठी...!

लई अवघड हाय गड्या... उमगाया बाप रं...!


आपली लाडकी...लेक

पल्लवी 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने