शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
हंगामाच्या तोंडावर संघटना आंदोलन करून कारखाने बंद पाडतात आणि त्यामुळे हंगाम लांबून शेतकऱ्यांचा ऊस वेळाने तुटतो. असं कारखान्यांचे म्हणणे असेल तर, आम्ही यावर्षी आंदोलन करत नाही. कारखान्यांनीच पुढे होऊन सप्टेंबर अखेर पर्यंत संघट्नांच्या बरोबर चर्चा करून ऊस दरावर तोडगा काढावा. अशी भूमिका आंदोलन अंकुश संघटनेचे चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी मांडली. ते काल रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी शेतकरी वजन कट्यावर आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.
यावर्षी च्या ऊस दराच्या आंदोलनात संघटनेची रणनीती ठरवण्यासाठी शेतकरी वजन काट्यावर अंकुश च्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते रघुनाथ पाटील गुरुजी होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून या बैठकीची सुरुवात करून पुढे बोलताना, धनाजी चुडमुंगे म्हणाले की, मागच्या तीन वर्षात साखर व प्राथमिक उप पदार्थ असलेल्या बग्यास व मळी चे दर उच्यांकी पातळीवर पोहोचलेले आहेत. साखर कारखान्यांनी आपल्याला झालेला फायदा पाहून शेतकऱ्यांना स्वताहून गत हंगामात तुटलेल्या उसास दुसरा हप्ता द्यायला पाहिजे होता.कारखान्यांना हंगामाच्या तोंडावर आंदोलन नको असेल तर त्यांनीच आता पुढाकार घेऊन तोडगा काढावा आणि 1 ऑक्टोबर ला हंगाम सुरु करावा.
यावेळी राकेश जगदाळे, दिपक पाटील, कृष्णा देशमुख यांनी आपली भूमिका मांडली. आभार अक्षय पाटील यांनी मानले. संघटनेचे उदय होगले, संभाजी शिंदे,नागेश काळे,संजय चौगुले, धनाजी माने, दिपक काळे, अचिन हेरवाडे, देवेंद्र चोगुले,विक्रम बाबर,भास्कर गावडे,सुरेश भोसले, संतोष चुडमुंगे,शिवाजी काळे, पिंटू मुंगळे व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
कारखाने लवकर सुरु करा म्हणून मोटर सायकल रॅली काढून निवेदन देणार :
उसाच्या हंगामाला यावर्षी अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. आमची भूमिका ही कारखाने लवकर सुरु होऊन शेतकऱ्यांचा ऊस लवकर तुटावा अशीच आहे. दुसरा हप्ता देऊन कारखाने वेळेत सुरु करा. हे सांगण्यासाठी आम्ही सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी शिरोळ तालुक्याचे आमदार आणि शरद कारखाण्याचे चेअरमन श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना व दत्त आणि गुरुदत्त या दोन साखर कारखान्यांना मोटर सायकल रॅली काढून निवेदन देणार असल्याचे यावेळी धनाजी चुडमुंगे यांनी घोषणा केली. शेतकऱ्यांनी या रॅली मध्ये मोठया प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
उसाच्या एका टनापासून पासून कारखान्यांना 6500 रुपये मिळाले :
गत वर्षी देशभरात उसाचे उत्पादन घटलेले होते आणि त्याचा परिणाम म्हणून साखर उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षभरात साखर सरासरी 40 च्या पुढेच कारखान्यांनी विकली आहे. बग्यासचा दर पण टणाला 4000 च्या पुढे मिळाला व मळी चा दरही 16000 च्या आसपास राहिला आहे. बाजारातील या दरांचा विचार करता एक टन उसातून निघालेल्या साखरेचे 4900 रुपये, बग्यास पासून 1100 रुपये व मळीचे 640 रुपये उत्पन्न कारखान्यांना यावर्षी मिळाले आहे. त्यातून साखर उत्पादन खर्च, व्यवस्थापन खर्च व तोडणी वाहतूक खर्च 3000 रुपये वजा जाता 3600 रुपये कारखान्याकडे शिल्लक राहतात. त्यातील 3200 रुपये शेतकऱ्यांना त्यांनी दिले आहेत. उर्वरित पैसे सप्टेंबर अखेर पर्यंत त्यांनी शेतकऱ्यांना द्यावेत आणि आंदोलन टाळावे अशीही विनंती धनाजी चुडमुंगे यांनी कारखानदारांना यावेळी केली.
टिप्पणी पोस्ट करा