जयसिंगपूर नगरपालिका हद्दीत परवानगीशिवाय झाडांची तोड : फौजदारी गुन्हा दाखल होणार...

 







जयसिंगपूर प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क



जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर ६ मध्ये नगरपालिकेच्या मालकीची झाडे विनापरवाना तोडल्याच्या घटनेमुळे जयसिंगपूरमध्ये पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. चिराग इंटरप्राइजेस या कंपनीने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता ही झाडे तोडल्याचा आरोप आंदोलन अंकुश या सामाजिक संघटनेने केला असून, या घटनेविरोधात त्यांच्याकडून जयसिंगपूर नगरपालिकेला काल सोमवार दिनांक 30 जून रोजी निवेदन देण्यात आले होते.




या निवेदनाद्वारे आंदोलन अंकुशचे पदाधिकारी रेवणजी चौगुले यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे तीव्र शब्दांत निषेध नोंदविला होता. त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की, जोपर्यंत झाडांची अवैध तोड करणाऱ्या चिराग इंटरप्राइजेसवर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत संघटना शांत बसणार नाही.




या संदर्भात नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी संबंधित घटकावर सोमवार सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, यानंतरही जर कारवाई झाली नाही, तर मंगळवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता.




याची गंभीर दखल घेत, जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी टीना गवळी मॅडम यांनी चेतन कांबळे, स्वछता निरीक्षक, जयसिंगपूर नगरपरिषद यांना अवैध वृक्षतोडी बाबत गुन्हा दाखल करनेकामी प्राधिकृत केले आहे. तसेच तात्काळ फिर्याद देण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, जयसिंगपूर यांना गुन्हा दाखल करणेबाबत पत्रव्यवहार केला आहे. 




यावेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, रेवणजी चौगुले, महेश जाधव, संपत मोडके, अक्षय पाटील, आप्पासो कदम, विकास शेषवरे, पोपट राणे, श्रावण कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने