शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
शिरोळ नगरपरिषदेचा घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेचा ठेका गेल्या ५ वर्षात एकाच कंपनीला १.५ कोटी, २ कोटी ते २.५ कोटीच्या आसपास देण्यात आलेला आहे. सदर ठेका देत असताना घालून दिलेल्या नियमावलीचा भंग करून ठेकेदार सह्याद्री ॲग्रोचे सर्जेराव पुंदे, पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी यांनी मिळून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप शिरोळचे युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी आज शनिवार दिनांक २८ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेऊन केला.
या पत्रकार बैठकीत नगरपरिषदेकडील घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता विभागाने पर्यावरण व प्रदूषण विभागाच्या नियम व अटी धाब्यावर बसवून शासकीय नियमांचे थेट उल्लंघन करून पदाधिकारी, प्रशासन व ठेकेदार यांनी संगनमत करून मागील पाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा सनसनाटी कागदपत्री आरोप करून, भ्रष्टाचार प्रकरणी प्रभारी मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, याला नरळे यांनी कागदपत्रांचे अवलोकन करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी दिली.
हजेरी पत्रक, बायोमेट्रिक हजेरी, कामगारांची संख्या याबाबतचे अद्ययावत रेकॉर्ड करण्याची जबाबदारी नगरपरिषद मुख्याधिकारी व संबंधित विभागाची असताना, ठेकेदार व अन्य संगनमतधारकांना मदत होईल, असे कामकाज करून चार वर्षात प्रत्येक महिन्याला सुमारे साडे सात लाख रुपये याप्रमाणे कोट्यावधी रुपयांची रक्कम घशात घातली आहे. टेंडर मधील करारानुसार दर दिवशी ७८ कामगार हजर करण्याची सक्ती असताना प्रत्यक्षात ३८ कामगार उपस्थितीत ठेऊन, उर्वरित ४० कामगारांचे प्रति दिवस, एका कामगार मागे ६५० रुपये प्रमाणे, दररोज जवळपास २६ हजार रुपये खिशात घातल्याचे कागदोपत्री दिसत आहे. त्याचबरोबर संबंधित ठेकेदार कामगारांचा पगार नियमाप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात जमा न करता, ६५० द्यावे लागतील म्हणून, रोख स्वरुपात २००, २५०, ३०० प्रमाणे देत आहे.
याशिवाय ओला, सुका व विषारी कचरा वेगवेगळा करून, त्यावर प्रक्रिया करून, शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट करण्याकरिता, प्रति वर्षी निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे, घनकचरा डेपोवर शेकडो टन ओला व सुका कचरा उघड्यावर पडून आहे.
यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या नियमावलीला बगल देऊन, कामगारांची संख्या जादा दाखवून त्यांचा पगाराची रक्कम परस्पर काढून घेण्याची कागदपत्रे स्पष्ट होत आहे. या शिवाय कामगारांच्या प्रोव्हिडंट फंड (PF), राज्य विमा संरक्षण योजना (ESI) अशा कोणत्याही रकमा जमा न करता, त्या परस्पर काढून घेऊन कामगारांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण करून शासकीय नियमावलीला तिलांजली देऊन तिजोऱ्या भरण्याचे काम ठेकेदार व अन्य सहभागी यांनी केले असल्याचे यादव यांनी नमूद केले.
दरम्यान, घनकचरा प्रक्रियेमध्ये पाच वर्षात झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी मुख्याधिकारी अजय नरळे यांची भेट घेतली असता, त्यांनी कागदपत्राचे अवलोकन करून फौजदारी गुन्हा दाखल करणे विषयी सहमती दर्शवली आहे. लवकरात लवकर घनकचरा प्रक्रीयेमध्ये कोट्यावधी रुपयांच्या घोटाळा करणाऱ्या घोटाळेबाजांवर गुन्हा दाखल करण्याविषयी आंदोलन उपोषण अधिक तीव्र करण्याचा निर्णय पृथ्वीराजसिंह यादव व त्यांच्या टीम ने घेतला आहे.
नागरिकांनी भरलेल्या करातून कोट्यावधी रुपयांचा ठेका घेऊन, सदर ठेकेदार शिरोळ गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या संदर्भात काहीही काम करताना दिसत नाही. गावातील गटारी सतत तुंबलेल्या असतात, घनकचरा उघड्यावर पडलेला आहे, कसलीही प्रतिबंधात्मक फवारणी होत नसल्यामुळे गावात रोगराईचे प्रमाण वाढलेले आहे. विशेष म्हणजे लेखापरीक्षणात प्रत्येक वर्षी त्रुटी येऊन देखील, याच ठेकेदारला कसा ठेका मिळतो...? याबद्दल गावात उलट सुलट चर्चा सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा