शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
सांगली कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या भयावह महापुराची कारणे हूडकून, त्याच्यावर कोण कोणत्या उपाययोजना कराव्यात..? महापुरा संदर्भात शासन कोण कोणत्या चुका करत आहे...? केंद्रीय जल आयोगाची नियमावली धरण प्राधिकरण का पाळत नाही...? महापूर हा निसर्गनिर्मित की मानवनिर्मित...? यासारखे अनेक प्रश्न व त्याची उत्तरे घेऊन आंदोलन अंकुश संघटना व कृष्णा महापूर नियंत्रण समिती, सांगली यांचेकडून गेली चार वर्षे झाले, पूरपरिषदेचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील कुरुंदवाडच्या संगम घाटावर उद्या रविवार दिनांक 06 जुलै 2025 रोजी दुपारी दोन वाजता यंदाच्या पूर परिषदेचे आयोजन केले आहे.
यासंदर्भात आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख श्री. धनाजी चुडमुंगे म्हणाले की, कोल्हापूर सांगली जिल्ह्याला गेल्या काही वर्षात महापूर या भयानक समस्येने घेरले आहे. शासन दरबारीं या लागोपाठ येत असलेल्या महापुरावर उत्तर शोधण्याचे प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत नाहीत. हे पाहून आंदोलन अंकुश संघटना आणि सांगलीची कृष्णा महापूर समितीने गेल्या चार वर्षांपासून पूर परिषदेच्या माध्यमातून शासनाचे पूर समस्ये कडे लक्ष वेधण्याचे काम सुरु ठेवले आहे. यावर्षीची पूर परिषद रविवारी कुरुंदवाड संगम घाटावर होणार असून ही पूर परिषद या भागाला पूर मुक्तीच्या दिशेने नेणारी ठरेल.
यावर्षीच्या पूर परिषदेस मार्गदर्शन करण्यासाठी पाटबंधारे खात्यात उच्य स्तरावर सेवा बजावून निवृत्त झालेले दोन पूर अभ्यासक येणार असून, त्यांच्या कडून या भागात पूर का येत आहेत आणि येणारे पूर कोणत्या उपाय योजना द्वारे रोखता येऊ शकतात याची मांडणी ते करणार आहेत.
अलमट्टी धरनाची उंची वाढ, जागतिक बँकेकडून मिळालेले 3200 कोटी व यावर्षी ही पुराची टांगती तलवार... या सर्व विषयावर या परिषदेत विचार मंथन होऊन पूरग्रतांच्या सहमतीने ठराव केले जाणार असल्याचे, आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी यावेळी सांगितले.
शासन महापुराला निसर्गाला जबाबदार ठरवून आपली जबाबदारी टाळू पहात आहे. पण वास्तव वेगळे असून ते समजून घेण्यासाठी सगळ्या पूरग्रस्त नागरिकांनी कुरुंदवाड संगम घाटावर दुपारी 2 वाजता मोठया संख्येने यावे असे आवाहन त्यांनी समस्त पूरग्रस्त नागरिकांना केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा