कुरुंदवाड प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
आज रविवार दिनांक 6 जुलै 2025 रोजी दुपारी ठीक 2 ते 5 या वेळेत आंदोलन अंकुश व कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती सांगली यांची चौथी पूर परिषद शेकडो पूरग्रस्त नागरिकांच्या व रिम झिम पावसाच्या साक्षीने उत्साहात पार पडली.
सदर पूर परिषदेत सहा ठराव करण्यात आले. या ठरवांना उपस्थित नागरिकांनी हात वर करून मान्यता दिली. ठराव पुढील प्रमाणे :
1) अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला आमचा विरोध आहे आणि आपल्या राज्य सरकारने उंची वाढीला सुप्रीम कोर्टात कायदेशीर विरोध करावा.
2) अलमट्टी धरणातील पाणीसाठा केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार नियंत्रित करावा. कर्नाटक सरकार ऐकत नसेल, तर अलमट्टी धरणाच्या डॅम इन्चार्ज ला आपल्या सरकारने होणाऱ्या नुकसानीस जबाबदार का धरू नये..? म्हणून कायदेशीर नोटीस काढावी.
3) हिप्परगी ब्यॅरेज च्या अतांत्रिक उभारणीबाबत योग्य त्या ठिकाणी आक्षेप घ्यावा.
4) जागतिक बँके कडून मिळालेल्या 3200 कोटी तून नदी पात्रातील भराव, पूल अडथळे ( महाराष्ट्र कर्नाटक हद्दीतील ) काढण्याची कामे प्राधान्याने करावीत.
5) कन्नड म्हैशाळ दरम्यानचे बेकायदेशीर ब्यॅरेज रद्द करून, त्या ठिकाणी फोल्डिंग बंधारा मंजूर करावा.
6) धरणात अनियंत्रण पाणी साठा केल्याने महापूर येऊन घरांचे, व्यवसायाचे व शेतीचे होणारे 100% नुकसान सरकारने द्यावे.
पूरपरिषदेचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक, सेवानिवृत्त कार्यकारी संचालक, कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे चे इंजि. प्रफुल्लचंद्र झपके यांनी धरण व्यवस्थापनाचा प्रश्न केवळ तांत्रिक नसून तो सामाजिक आणि पर्यावरणीय आयामांशी जोडलेला आहे. त्यामुळे या विषयाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. अनेक अभ्यासक संस्था गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रात सखोल संशोधन करत असून त्यांनी विकसित केलेले पर्यायी निकष शासनाने गांभीर्याने विचारात घ्यावेत. कृष्णा खोऱ्यात वारंवार उद्भवणाऱ्या महापुरासारख्या आपत्तींवर प्रभावी नियंत्रण मिळवायचे असल्यास, केवळ तात्कालिक उपायांचा आधार न घेता दीर्घकालीन, शास्त्रशुद्ध आणि सर्वंकष धोरणे राबवणे अत्यावश्यक आहे. शासन, अभ्यासक संस्था आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्यातील प्रभावी समन्वयातूनच या समस्येचे स्थायिक समाधान शक्य आहे, असे मत व्यक्त केले.
यावेळी इंजि. शांतिनाथ ज. पाटील (सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग) इंजि. प्रभाकर केंगार (सेवानिवृत्त उपअभियंता, जलसंपदा विभाग, सांगली) मा.चिंतामणी सहस्त्रबुद्धे, (ज्येष्ठ पत्रकार व जिल्हा अभ्यासक) यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्व तज्ञ मंडळींचे हेच मत होते की, दरवर्षी येणाऱ्या महापुराला अलमट्टी धरणच जबाबदार असून, केंद्रीय जल आयोगाच्या नियमावली नुसार धरणांचे परिचलन व्यवस्थित केल्यास महापूर नक्कीच टाळता येतो.
स्वागत आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख श्री.धनाजी चुडमुंगे यांनी केले तर आभार कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक श्री. सर्जेराव पाटील यांनी मानले.
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे व कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
अलमट्टी धरणाची उंची 524 मीटर पूर्वीच बांधकाम करून ठेवलेली आहे. सध्या कर्नाटक सरकार 524 मीटर उंचीने पाणी साठवण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागत आहे. असे असताना महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्या एका भाषणात म्हणतात की, अलमट्टी धरणावरती एक वीट सुद्धा बांधून देणार नाही. हे आपल्या मंत्र्यांचे अज्ञान म्हणायचे की, मंत्री महोदय नागरिकांना खुळ्यात काढत आहेत. असा आरोप कृष्ण महापूर समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केला.
टिप्पणी पोस्ट करा