जयसिंगपूर मध्ये आंदोलन अंकुश चा दणका : प्रशासनाला आली खडबडून जाग...



जयसिंगपूर प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क



जयसिंगपूर मध्ये काही दिवसांपूर्वी अवैधरित्या झालेली वृक्ष तोड व भुयारी गटारी करण्याच्या नावाखाली उकरून ठेवलेले रस्ते या विषयांवर आंदोलन अंकुश संघटना जयसिंगपूर प्रशासनाच्या हात धुवून मागे लागलेली आहे. आठ दिवसात उकरलेले रस्ते चालू न केल्यास उपोषण करण्याचा ईशारा आंदोलन अंकुशने जयसिंगपूर प्रशासनाला दिला होता. 



गेल्या दोन महिन्यापासून शहरातील नागरिकांचा खड्ड्यातून प्रवास सुरू आहे. शिवाय पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचून सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकातून नगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. आंदोलन अंकुश ने शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा नगरपालिकेला दिला होता. 






नगरपरिषदेने याची त्वरित दखल घेऊन, शुक्रवारी शाहूनगर भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मुरुम भरून रोलर फिरवण्यात येत आहेत. त्याचबरोबर शहरातील इतर रस्त्यावरील खड्ड्यावरही मुरुम टाकून रस्ता दुरूस्ती करण्यात येणार आहे. पावसाळा संपल्यानंतर पक्के रस्ते करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. आंदोलन अंकुशच्या धास्तीने त्वरित रस्ते होत असलेमुळे जयसिंगपूर मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.






वृक्ष तोड करणार्‍या आरोपींना 5 दिवसात शोधून काढतो :  जयसिंगपूरचे पी. आय. हाके यांचे आंदोलन अंकुश च्या कार्यकर्त्यांना आश्वासन 



जयसिंगपूर मधील दुसऱ्या व सहाव्या गल्लीत नगरपरिषदेच्या  मालकीच्या झाडांची विना परवानगी कत्तल करणाऱ्या लोकांच्या विरोधात जयसिंगपूर नगरपरिषद ने फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास गतीने होत नाही, म्हणून आज आंदोलन अंकुश च्या कार्यकर्त्यांनी जयसिंगपूर पोलीस स्टेशन ला धडक देऊन पी.आय. हाके यांना तपासाबाबत विचारणा केली.



या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या माने पोलीस यांच्या तपासाबाबत शंका उपस्थित करून, हा तपास  योग्य दिशेने सुरु नसून, पोलीस खऱ्या आरोपी पर्यंत का जात नाहीत..? याचा जाब आंदोलन अंकुश च्या कार्यकर्त्यांनी विचारला असता,  पी.आय. हाके यांनी दोन दिवसात हा तपास पूर्ण करतो असे सांगितले. पण दोन नाही, तर पाच दिवस घ्या. पण सगळ्या गुन्हेगारांना शोधून अटक करा, झाडे तोडण्यासाठी वापरलेली वाहने, क्रेन व झाडे ताब्यात घ्या. अशी मागणी आंदोलन अंकुशचे प्रमुख श्री.धनाजी चुडमुंगे यांनी केली. यामध्ये हयगय किंवा टाळाटाळ करून खऱ्या आरोपीना वाचवण्याचा आपण प्रयत्न केल्यास  आपली तक्रार वरिष्ठाकडे केली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.



या शिष्ठमंडळात धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, महेश जाधव, शंकर नाळे, अभिजित पाटील, अशाराणी पाटील, महादेव काळे, राहुल माने समाविष्ट होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने