बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलना बाबत आंदोलन अंकुश संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र : मागण्या मान्य न केल्यास रस्त्यावर उतरणार





शिरोळ प्रतिनिधी : मंगेश नलावडे



गेले 6 दिवस झाले शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे, दिव्यांगांचे, प्रश्न घेऊन आदरणीय बच्चुभाऊ कडू हे मोझरी अमरावती या ठिकाणी अन्नत्याग उपोषण करत आहेत. त्यांनी सरकारकडे केलेल्या रास्त मागण्या त्वरित मान्य कराव्या, अन्यथा आंदोलन अंकुश संघटना देखील रस्त्यावर उतरेल. अशा आशयाचे निवेदन आज आंदोलन अंकुश संघटनेने मुख्यमंत्रीसो, महाराष्ट्र राज्य यांना दिले आहे निवेदनात म्हटले आहे की, 



राज्यातला शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, शेतीमालाला भाव नसल्यामुळे आज आर्थिक अडचणीत सापडला आहे. सरकारने वेळोवेळी लादलेल्या निर्यात बंदी, बाजार बंदी, अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत शेतीमालाचे भाव पाडल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्याला कर्ज मुक्त करणार म्हणून आपल्या महायुती ने विधानसभा निवडणुकीत जाहीरनामा काढून मते मागितली होती.  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती मिळेल म्हणून या आशेने महायुती ला मताचे दान देऊन सत्तेवर बसवले.






आपणच निवडणुकीत जाहीरनाम्यातून दिलेला शब्द पाळणे, ही आपली जबाबदारी होती. पण ती पाळली नाही. उलट आपले सरकार मधील प्रमुख सहकारी, कर्ज मुक्ती चे आश्वासन पूर्ण करणे शक्य नाही. म्हणून दिलेला शब्द फिरवत आहेत आणि हीच शेतकऱ्यांची फसवणूक आहे.



सरकार च्या चुकीच्या शेती धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आला आहे आणि कर्जबाजारी पणामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. काही लाख रुपये कर्जासाठी शेतकरी दररोज आपले जिवन संपवत असताना, सरकार मात्र त्याला सावरण्याचा व आधार देण्याचा प्रयत्न करण्याचे सोडून, त्याला कर्ज भरावेच लागेल. म्हणून त्याची चेष्टा करत आहे.



सरकार च्या धोरणामुळे शेतकरी वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत गेला. त्याला यातून बाहेर काढण्याची जबाबदारी पण सरकार म्हणून आपली आहे. ती जबाबदारी सरकार टाळत आहे म्हणून सगळा शेतकरी समाज सरकार वर नाराज आहे.


माजी आमदार बच्चू कडू यांनीही याच कर्ज मुक्ती च्या मुद्यावर उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 6 वा दिवस असून, त्यांनी अन्नत्याग केल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.



सरकार ने तातडीने कर्ज मुक्ती करत असल्याचे जाहीर करून त्यांचे उपोषण सोडवावे. अशी महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे. त्याचा आदर करून तात्काळ उपोषण सोडवावे अशी विनंती आहे.



सरकारने याबाबत चालढकल केल्यास आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास, शेतकरी रस्त्यावर येतील आणि ते सरकार ला सोसणार नाही. याची जाणीव ठेऊन तात्काळ कर्ज मुक्ती करून उपोषण सोडवावे अशी आपल्याला विनंती आहे.


सदर निवेदनाची प्रत तहसीलदारसो, शिरोळ यांना देखील देण्यात आली आहे. निवेदन नायब तहसीलदार किर्ती पाटील मॅडम व भिसे साहेब यांनी स्वीकारले.



यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, कृष्णा देशमुख, अभिजीत पाटील, अचीन हेरवाडे, अमर सावंत, महेश जाधव इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने