शिरोळ पाणी प्रश्नावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी... सध्या सुरू असलेले आंदोलन म्हणजे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी शिरोळच्या जनतेची दिशाभूल : अर्जुन काळे

              आंदोलांनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ मध्ये झळकलेला डिजिटल 


शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क 


शिरोळ गावामधील पाणी प्रश्न चांगलाच तापला असून, गेल्या 2 आठवड्यांपासून शिरोळ चे माजी उपसरपंच पृथ्वीराजसिंह यादव पाणी प्रश्नासाठी शिरोळच्या छ.शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलनास बसलेले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठकीच्या आश्वासनानंतर त्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे. 


या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंचवार्षिकला सत्तेत असेलेल्या राजर्षी शाहू विकास आघाडीकडून शिरोळ मधील नागरिकांना जी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे,त्याला सर्वस्वी आत्ता आंदोलनाला बसलेले नेतेच जबाबदार आहेत, अशी वारंवार टीका केली जात आहे. काल 17 एप्रिल 2025 रोजी देखील शिरोळ चे माजी सरपंच श्री.अर्जुन काळे व प्रवीण ईश्वरा माने यांनी महितीपत्रक काढून सदर आंदोलनावर कडाडून टीका केली आहे. माहितीपत्रकात म्हंटले आहे की,


पुढच्या निवडणुकीत मताचा जोगवा कसा मागायचा यासाठी आंदोलन : 


आत्ता चालू असलेले आंदोलन म्हणजे, आंदोलन नावालाच बदनाम करणारे धरणे आंदोलन आहे. नगरपरिषद मध्ये 5 वर्ष सत्तेचा फायदा करून घेण्याच्या नादात आपण विरोधात निवडून आल्याचा विसर या गटाला पडला...  पण निवडणुकीला लोकांना काय सांगायचं..? मताचा जोगवा कशाच्या आधारे मागायचा...? हे लक्षात आल्यावर मग यांना 5 वर्ष नगरपरिषद मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार झाला आहे.


आंदोलन करणार्‍यांनी स्वतःची घरं पहिला भरली : 


विकास आराखड्यात राजकारण करण्याचा यांचा डाव फसल्यावर मग यांना लोकांना पाणी मिळत नाही हे आठवले आहे. मुळात गेल्या 40 वर्षात गावात 30 वर्ष यांचीच सत्ता असताना यांनी कधीही गावाची काळजी केली नाही, तर आपलं घर कसं भरेल हेच पाहिलं आहे. यांच्याच कर्तृत्वाचा परिणाम म्हणजे दोन नद्या असताना, गावाला पुरेसं पाणी सुद्धा यांना देता आलं नाही आणि आता निवडणूक समोर आल्यावर हे गावाला पाणी का मिळत नाही म्हणत आहेत.



जुन्या पाणी योजनेची वाट लावल्यामुळेच आजची परिस्थिती : 


2006 ला यांनीच राजकारण करून पाणी योजनेची वाट लावली, त्यामुळेच गेल्या 15 वर्षात शिरोळ मधील लोकांना पाणी पाणी करायची वेळ आली आहे.  हे यांनी विसरलं असलं तरी जनता विसरलेली नाही.


नगरपरिषद मध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून, आता हे चौकात भजन करून सांगत आहेत. हेही हास्यास्पद आहे. कारण भ्रष्टाचार हा चौकात होत नसतो, तर तो नगरपरिषद सभागृहात होत असतो आणि तिथे तर यांचे 8 नगरसेवक होते. एक नगरसेवक तर यांच्या घरातीलच होता. भ्रष्टाचार होत असताना त्यावेळी हे नगरसेवक काय करत होते...? भ्रष्टाचार होत होता त्यावेळी का चौकात येऊन गावाला सांगितला नाही...?


भ्रष्टाचार झाला हे म्हणायचा अधिकार यांना नाही : 


मुळात भ्रष्टाचार झाला हे म्हणायचा पण यांना अधिकार नाही, कारण यांच्या सत्तेच्या काळात दररोज भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे घेऊन उपोषण आंदोलन होत असलेली गावाने पाहिली आहेत. त्याच्या सुरस कहाण्या लोकांनी ऐकल्या आहेत. गेल्या 15 दिवसापासून सवडी शास्त्रानुसार चौकात जे धरणे आंदोलन सुरु आहे, त्या आंदोलनाची मागणी काय आहे...?  हेच प्रशासनासह कोणालाच माहित नाही. ठोस मागणी नसल्यामुळे लोकं पण या आंदोलना पासून अलिप्त आहेत.


बदनामी करण्याची उद्देशाने, आंदोलनाच्या नावाखाली तमाशा : 


यांचा पिंड आंदोलनाचा नसल्याने यांच्या कडे संयम नाही.  निव्वळ राजकीय हेतू ठेऊन आणि बदनामी करायच्या उद्देशाने आंदोलन तर चालू ठेवायचे,  या उद्देशाने मग आंदोलनाच्या नावाखाली तमाशा केला जात आहे.  पण यातून आंदोलन बदनाम होतंय याची यांना जाणीव नाही.


असो निवडणूक होईपर्यंत यांचा समोरून भजन आणि आतून राजकारणाचा तमाशा सुरु राहणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने