शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
महापुरासाठी मुख्य कारणीभूत असणाऱ्या अलमट्टी धरणाची 5 मिटरने उंची वाढविण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. कर्नाटक सरकारचा हा डाव यशस्वी झाल्यास सांगली कोल्हापूर जिल्ह्याला दरवर्षी महापुराचा सामना करावा लागणार आहे.
त्यामुळे अलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या अभ्यासू लढ्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आंदोलन अंकुश संघटनेने दंड थोपटले आहेत. आंदोलन अंकुश संघटना आपल्या मोजक्याच फौजेला घेऊन समाजातील सर्व स्तरातील नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी कायमच लढा उभा करत असते.
अलमट्टी च्या उंचीला कायदेशीर विरोध आवश्यक : धनाजी चुडमुंगे
अलमट्टी उंची वाढीचे विरोधात महाराष्ट्र शासन ठोस विरोध करताना दिसत नाही. त्यामुळे आंदोलन अंकुश संघटनेने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला विरोध म्हणून
* भारताचे माननीय पंतप्रधान
* जलशक्ती मंत्रालयाचे सचिव
* केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष
* पर्यावरण मंत्रालयाचे सचिव
* व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
यांना रजिस्टर पत्र पाठवून सदर उंची वाढीला हरकत घेण्याचे काम चालू केले आहे.
हरकतींचा पाऊस पाडा :
आपलं महाराष्ट्र सरकार कर्नाटक सरकार ला अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यापासून रोखण्यात अपयशी ठरत असलं तरी, ज्यांचं नुकसान होणार आहे त्यांनी जर मनावर घेऊन उंचीला विरोध आहे म्हणून हरकतींचा पाऊस पाडला तरच भविष्यात पूर मुक्ती मिळेल अन्यथा दरवर्षी पुरात बुडावे लागनार आहे.
अलमट्टी धरणाच्या उंचीला आमचा विरोध आहे. म्हणून नागरिकांनी केंद्र सरकार कडे हरकती दाखल करण्याचे अभियान तालुक्यात राबवले जात आहे. त्याअनुषंगाने संपूर्ण शिरोळ तालुक्यात गेल्या 8 दिवसांपासून आंदोलन अंकुश संघटनेने हरकती भरून भरून घेण्याचे काम चालू केले आहे असे धनाजी चुडमुंगे म्हणाले.
धनाजी चुडमुंगे पुढे म्हणाले की, अलमट्टी धरणाच्या उंचीला नागरिकांनी कायदेशीर विरोध केला पाहिजे, तरच तालुक्याला भविष्य आहे. आपण आत्ताच या धरणाच्या उंचीला विरोधाची भूमिका घेतली नाही, तर याचे परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागणार आहेत. पुढच्या पिढीचे भविष्य घडवण्यासाठी आपल्याला आत्ताच या उंचीला विरोध करावा लागेल म्हणून आंदोलन अंकुश ने हे पाऊल उचलले आहे.
म्हणून प्रत्येक पूरग्रस्त नागरिकाने सदर अलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध दर्शविण्यासाठी आपली हरकत भरून पाठवावी व केंद्र सरकारला सदर बाब गांभीर्याने घेण्यास भाग पाडावे. अन्यथा येणारी पुढची पिढी आपल्याला कदापी माफ करणार नाही.
टिप्पणी पोस्ट करा