कुरुंदवाड प्रतिनिधी : नंदकुमार सुतार सर (लगाम न्यूज नेटवर्क)
येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून मनोजकुमार देसाई यांची नियुक्ती झाली असून, नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला आहे. येथील नगरपालिकेचे तात्कालीन मुख्याधिकारी आशिष चौहाण यांची बदली झाल्यानंतर, त्यांच्या जागी प्रभारी मुख्याधिकारी म्हणून हातकणंगले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्याकडे तात्पुरता पदभार दिला होता. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिले होते. त्यामुळे कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावे म्हणून मागणी होत होती.
आष्टा येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांची बदली आजपासून कुरूंदवाड नगरपालिकेत झाली असून, आज मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या समोर शहराची नवीन पाणीपुरवठा योजनेचा गंभीर प्रश्न असून ती योजना पूर्ण होण्यासाठी गेली साडेतीन महिने नगरपालिकेसमोर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर शहरातील कचरा उठाव असे अनेक प्रश्न आहेत.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई म्हणाले की, शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न, कचरा उठाव व रस्ते गटारी यांची कामे मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पूर्वीचे तात्कालीन मुख्याधिकारी निखिल जाधव व आशिष चौहाण या दोन्ही मुख्याधिकाऱ्यांची कार्यकीर्द वादग्रस्त ठरली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर शहरातील कृती समितीच्यावतीने अनेक वेळा आंदोलने केली होती. त्यामुळे मनोजकुमार देसाई यांच्यासमोर शहरातील प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान आहे.
शिरोळ शहराला गेल्या 6 महिन्यांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाही. प्रभारी मुख्याधिकारी कधी येतात, कधी जातात फक्त त्यांनाच माहिती असते. एवढ्या मोठ्या शहराला एक जबाबदार अधिकारी मिळत नसेल तर, येथील नागरिकांचे हे दुर्दव्य म्हणाले लागेल. शहराला मुख्याधिकारी नसल्यामुळे नागरिकांची महत्वाची कामे प्रलंबित राहत आहेत. शहराच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न असून, निर्णय घेणारा अधिकारी नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
टिप्पणी पोस्ट करा