शिरोळ तालुक्यातील महापूर नियंत्रणासाठी आठ दिवसात बैठक... पालकमंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन : धनाजी चुडमुंगे




प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क



महापूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेने दिलेल्या 3200 कोटी निधी मध्ये शिरोळ तालुक्यातील पूर नियंत्रणासाठी कोणती कामे करणार आहात...?  या मागणीसाठी आणि अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात आज सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजलेपासून आंदोलन अंकुश संघटनेने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास सुरुवात केली होती. या उपोषनाच्या ठिकाणी पालकमंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी भेट देऊन चर्चा केली व आठ दिवसात बैठक घेण्याचे यावेळी जाहीर केले.






त्यानंतर जिल्हाधिकारीसो यांच्या दालनात पुन्हा बैठक होऊन, येत्या आठ दिवसात डी. पी. आर. बनवणारी खाजगी कन्सलटंट कंपनी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची आठ दिवसात बैठक घेण्याच्या सूचना पाटबंधारे अधीक्षक अभियंता श्री. म्हेत्रे यांना दिल्यामुळे आजचे आंदोलन अंकुश संघटनेचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.



यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले, गेली 20 वर्ष शिरोळ तालुक्याला महापुराचा त्रास सुरु आहे. 2019 पासून च्या पाच वर्षात तीन वेळा महापूर येऊन नुकसान करून गेला आहे. महापूर नियंत्रणासाठी म्हणून सरकार ने गेल्या 20 वर्षात एक रुपया सुद्धा खर्च केला नाही. महापूर येऊन गेल्यावर भिकेसमान नुकसान भरपाई म्हणून दिली जाणारी रक्कम ही अत्यंत तोकडी देऊन सरकार ने आपली चेष्टाच केली आहे.






वारंवार येत असलेल्या महापुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून जागतिक बँके कडून 3200 कोटी रुपये कर्ज घेतले आहे. त्या पैशातून सर्वात जास्त नुकसान सोसणाऱ्या शिरोळ तालुक्याला पुरमुक्ती साठी काय नियोजन आहे हे अजून समजले नाही.



महापूर येऊ नये म्हणून जागतिक बँक पैसे लावत आहे. महाराष्ट्र शासन मात्र त्यात शहरांना प्राधान्य देऊन, पूर लवकर ओसरण्यासाठी म्हणून ते पैसे वापरत आहे. यासंदर्भात दोन आठवड्यापूर्वी शासन निर्णय निघाला आहे, त्यात 1000 कोटी कोल्हापूर- सांगली -इचलकरंजी मध्ये गटारी करण्याचे धोरण समोर आले.



जागतिक बँकेच्या निधीतून महापुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याचे सरकार चे नियोजन चांगले असले तरी, ते वास्तवात यायला बरीच वर्ष जाणार आहेत. पण त्यातून महापूर रोखला जाईल याबद्दल तज्ञांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. 20 वर्षात 5 महापुरांनी शिरोळ तालुक्यातील सगळे जन- जिवन उध्वस्त झाले आहे. कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा काठावरील सुपीक जमीन दरवर्षी च्या पुराणे नापिक होण्याच्या मार्गांवर आहे, तर काठावरील गावे भयग्रस्त झाली आहेत.



सरकार जागतिक बँकेच्या निधीतून पुरमुक्ती चे गाजर आम्हाला दाखवत आहे. सरकार महापूर नियंत्रणासाठी म्हणून शिरोळ तालुक्यात कोणत्या उपाय योजना राबवणार आहे हे विचारण्यासाठी उपोषणास सुरुवात केली होती. महापुराचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्याला महापुरा पासून वाचवण्यासाठी आपलं काय नियोजन आहे...? सरकार च्या धोरणात शिरोळ तालुका बसतो की नाही असे प्रश्न पालकमंत्री यांना धनाजी चुडमुंगे यांनी विचारले.



यावेळी आंदोलन अंकुश चे राकेश जगदाळे, दिपक पाटील, उदय होगले, नागेश काळे, संभाजी शिंदे, संजय चौगुले, भारत ढाले, दत्तात्रय जगदाळे, बंडू होगले, पप्पू मुंगळे, अचिन हेरवाडे व जिल्ह्यातील बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने