शिरोळ प्रतीनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
ज्याला जमीन घर नाही, अश्या बेघर नागरिकांना शासनाकडून अत्यल्प शुल्क भरून भूखंड वाटप करण्यात आलेले आहेत. परंतू शिरोळ तालुक्यातील बर्याच नागरिकांना शासनाच्या यादीत नाव असून, त्यांच्याजवळ कबूलायत कब्जे पट्टीची रक्कम भरलेली पावती असून भूखंड मिळालेले नाहीत. अश्याप्रकारे शिरोळ तालुक्यात शासनाचे प्लॉट वाटपात खूप मोठा घोटाळा झाला असल्याची शिरोळ तालुक्यात चर्चा आहे.
मौजे आगर ग्रामपंचायत हद्दीतील प्लॉट वाटपात देखील अश्याच प्रकारचा घोटाळा झालेला आहे. ज्यांच्याकडे शासनाने दिलेली कबूलायत आहे, पैसे भरलेली पावती आहे, अश्या लोकांना प्लॉट मिळालेले नाहीत, परंतू ज्यांच्याकडे शासकीय कोणताच कागद नाही अश्या लोकांनी बेकायदेशीर 2-3 मजली ईमारती बांधून भाड्याने दिलेल्या आहे. शासकीय परवानगी नसलेल्या एका खाजगी अभियंताने सर्व प्लॉट वाटप केलेले आहेत व सर्व कागदपत्रे,माहिती त्याच व्यक्तीकडे आहेत असा आरोप प्लॉट न मिळालेल्या नागरिकांनी केलेला आहे. एवढे सर्व घडत असताना महसूल प्रशासन झोपा काढत होते, काय असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
मौजे आगर ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 813 मधील मंजूर प्लॉट मिळणेबाबत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याबाबत 23 मे 2025 रोजी रमेश शामराव दाभाडे, बाबासो तुकाराम चुडमुंगे, मिना बाळासो कलमाटे, जयश्री प्रकाश चव्हाण यांनी तहसिलदारसो शिरोळ यांना निवेदन दिले होते. परंतू 1 महिना झाला तरी कोणतीही कार्यवाही तहसील कार्यालयाकडून झाली नाही. सदर निवेदनाकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे, आज सोमवार दिनांक 23 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता वरील नागरिकांनी आमरण उपोषणास सुरवात केली.
आंदोलकांचे म्हणणे होते की, मा.उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी यांचे कडील दिनांक 15/03/2025 च्या आदेशाने मौजे आगर गट नंबर 813 मध्ये आम्हास प्लॉट मंजूर झालेला आहे. शासकीय नियमांनुसार सदर प्लॉटचे पैसेही आम्ही त्याचवेळी जमा केलेले आहेत. परंतू अद्याप आम्हास प्लॉट मिळालेला नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झालेला आहे.
वेळोवेळी गाव कामगार तलाठी मौजे आगर, मंडळ अधिकारी शिरोळ व तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधून सुद्धा समाधानकारक माहिती मिळत नसून,आम्हास अद्याप पैसे भरूनही प्लॉट देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. सदर प्रकरणी लक्ष वेधण्यासाठी मौजे आगर ग्रामपंचायतीसमोर दिनांक 8 जुलै 2024 रोजी आम्ही उपोषण सुरू केले होते. त्यावेळी मंडळ अधिकारी शिरोळ यांच्या दूरध्वनी वरुन तहसिलदार कार्यालयात बोलविण्यात आले होते. त्यावेळी नायब तहसिलदारसो यांच्या समक्ष झालेल्या चर्चेप्रमाणे ग्रामपंचायतने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नसून सदर गट नंबर मधील अतिक्रमण ही हटवलेली नाही व आम्हास प्लॉट ही मिळालेला नाही.
सदर प्रकरणी दुपारी 3 वाजता तहसिलदारसो,शिरोळ, गट विकास अधिकारीसो,शिरोळ व आंदोलकांच्यात बैठक झाली. तहसिलदार शिरोळ यांनी रिकामे प्लॉट ताब्यात घेऊन ज्यांचेकडे कागदपत्रे असतील,त्यांना देण्याचे कबूल केल्यावर सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. याविषयी यासंदर्भातील सर्वांनी बोलावून गुरुवारी दिनांक 26 जून रोजी पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे तहसीदारांनी संगितले.
टिप्पणी पोस्ट करा