प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
दरवर्षी येणारा महापूर म्हणजे, शिरोळ तालुक्यासह सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्तित्वाचा प्रश्न होऊन बसला आहे. पावसाळा आला की, या भागातील नागरिकांची महापुराच्या धास्तीने झोप उडालीच. राज्यातील लोकप्रतिनिधींना मात्र या गंभीर प्रश्नाचे काही घेणे देणे नाही, अशी पूरग्रस्त नागरिकांच्यात चर्चा आहे.
अलमट्टी उंची वाढ आणि महापूर नियंत्रण या प्रश्नावर आंदोलन अंकुश संघटना व कृष्णा पूर नियंत्रण नागरी समिती यांच्या कडून जण जागृतीचे व शासनाचे लक्ष वेधण्याचे काम गेली 4 वर्ष अखंड सुरु आहे. 2021 पासून या गंभीर विषयावर पूर परिषदेच्या माध्यमातून विचार मंथन करण्यात येत असून, या वर्षीची पूर परिषद 6 जुलै ला कुरुंदवाड येथील कृष्णा घाटावर घेण्यात येणार आहे.
2005 पासून सलग येत असलेल्या महापुरावर शासनाने कायमस्वरूपी उपाय योजना राबवाव्यात व या भागाला पूर मुक्त करावे, या उद्देशाने 2022 पासून आंदोलन अंकुश संघटने कडून पूर परिषद घेतली जात असून, यावर्षीची ही 4 थी पूर परिषद कुरुंदवाड येथील ऐतिहासिक अशा कृष्णा संगम घाटावर होणार आहे. या पूर परिषदेत अलमट्टी धरणाची उंची वाढ कशी रोखता येईल व जागतिक बँकेचा जास्ती जास्त निधी पूर येऊ नये, यासाठी कसा वापरता येईल. याचा ओहापोह या पूर परिषदेत केला जाणार आहे.
या पूर परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी पूर अभ्यासकांना निमंत्रित केले जाणार आहे. त्याचबरोबर अलमट्टी उंचीला कायदेशीर विरोध कसा करावा, याचीही मांडणी वकिलांच्या कडून या पूर परिषदेत होणार आहे.
लागोपाठ येणाऱ्या महापुरास व त्यामुळे होणाऱ्या नुकसानीस संपूर्णपणे अलमट्टी धरण आणि हिप्परगी ब्यारेज कारणीभूत असून, या धरणात केला जाणारा अनियंत्रित आणि बेकायदेशीर पाणी साठा रोखल्याशिवाय आपल्या भागातील पूर नियंत्रण शक्य नाही, हे गेल्या चार वर्षातील आंदोलन अंकुश संघटनेच्या सततच्या पाठपुराव्याने सरकार च्या लक्षात आले आहे. पण अजूनही कर्नाटक विरोधात ताठर भूमिका घ्यायला आपले शासन कमी पडत असल्यामुळे येथील जनतेला दरवर्षी महापुराच्या धास्तीत जगावे लागत आहे.
सरकार ला जागे करण्यासाठी आणि पूर बाधित लोकांना आधार देण्याच्या उद्देशाने ही पूर परिषद अत्यंत मोलाचे काम करणारी ठरत असून, जनतेने सत्य वस्तुस्थिती समजावून घेण्यासाठी रविवार दिनांक 6 जुलै रोजीच्या कुरुंदवाड येथील कृष्णा संगम घाटावर मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आंदोलन अंकुश संघटना व कृष्णा पूर नियंत्रण नागरी समिती यांच्या कडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा