शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाची परवानगी काढून बसविणे, म्हणजे शिवधनुष्य उचलण्या समान गोष्ट झाली आहे. महापुरुषांचा अपमान होऊ नये व त्यामुळे समाजाला वेगळे वळण लागू नये. यासाठी महापुरुषांचे पुतळे बसविण्यासाठी प्रशासनाने अनेक अटी घातल्या आहेत.
टाकवडे येथे बुधवार दिनांक 14 मे रोजी पहाटे अज्ञात शिवभक्तांनी, चबूतारा बांधून, छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धआकृती पुतळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर विनापरवाना बसवला. बुधवारी सकाळी सदर बाब लक्षात आल्यानंतर प्रशासनाची तारांबळ उडाली. सर्वसामान्यांच्या कामाच्या वेळी अजिबात तत्परता न दाखविनाऱ्या महसूल व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी त्वरित हजेरी लावून, प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सदर पुतळा हटवून प्रशासनाच्या ताब्यात घेतला.
तणावपूर्ण वातावरणात प्रशासनाने हटवीला पुतळा :
विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याने ग्रामपंचायत प्रशासन व नेतेमंडळी यांना बोलवून प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी तुम्ही स्वतःहून पुतळा काढून घ्यावा असे सांगितले, परंतु पुतळा काढण्यास शिवभक्तांनी नकार दिल्याने टाकवडे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. सदर विरोधाला झुगारून प्रशासनाने शेवटी पुतळा आपल्या ताब्यात घेतला व तहसीलदार कार्यालयात सुरक्षित स्थळी ठेवला. यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शिवभक्तांनी प्रशासनाच्या या कृतीचा निषेध म्हणून गावातून निषेध रॅली काढली. गावात येणारे सर्व मुख्य रस्ते बंद केले. टायरी पेटवल्या. दोन दिवसात होणारा उरुस बंदची हाक दिली. आज गुरुवारी देखील टाकवडे गावामध्ये पूर्णपणे बंद पाळण्यात आला आहे. जिकडे तिकडे शुकशूकाट दिसत आहे.
दरम्यान टाकवडे गावचे ग्रामपंचायत अधिकारी विलास तेजराव फोलाणे यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंती कमिटीचे अध्यक्ष मयूर तानाजी झुटाळ व कमिटीचे इतर सदस्य यांचे विरोधात पोलीस स्टेशन शिरोळ मध्ये फिर्याद दिलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या व ग्रामपंचायत टाकवडे यांचे कब्जात असलेल्या जागेमध्ये कोणतीही परवानगी न घेता फौजदारी पात्र अतिक्रमण करून, कार्यालय समोरील मोकळ्या प्रांगणामध्ये अंदाजे दहा फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा अनाधिकृतपणे उभा केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा