शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरची 524 मीटर करून शिरोळ तालुक्यासह, सांगली-कोल्हापूर जिल्हा पाण्याखाली घालवण्याचा घाट घातलेला आहे. महापूर येऊन भयंकर परिस्थिती निर्माण होणार हे समजत असून देखील, महाराष्ट्र सरकार अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला ठोस विरोध करताना दिसून येत नाही.
या विरोधात शिरोळ तालुक्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, संघटना, नेते एकत्र येऊन लढा देताना दिसत आहेत. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये व या उंची वाढीला महाराष्ट्र सरकारने ठोस विरोध करावा, यासाठी उद्या रविवार दिनांक 18 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता अंकली टोल नाका येथे सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने पूरग्रस्त नागरिक सहभागी व्हावेत, यासाठी सर्वच पक्ष, संघटना, नेते ताकदीने उतरलेले दिसत आहेत. चक्काजाम आंदोलनाच्या वेळी जास्तीत जास्त पूरग्रस्त यावेत व अलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या विरोधासाठी शिरोळ तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.
यामध्ये आ.सतेज पाटील, आ. अरुण लाड, आ.राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खा.राजू शेट्टी, माजी आ. उल्हास पाटील, दत्त कारखान्याचे गणपतराव पाटील, शिरोळ चे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, आंदोलन अंकुश चे धनाजी चुडमुंगे, शिवसेनेचे वैभव उगळे यांचेसह सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे नेते व संघटना आघाडीवर येऊन लढताना दिसत आहेत.
आंदोलन अंकुशने संघटनेने सर्वात प्रथम रोवली मुहूर्तमेढ :
अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला प्रथम आंदोलन अंकुश संघटना गेल्या बऱ्याच दिवसांपासून विरोध करत आहे. या संघटनेने शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात फिरून अलमट्टीच्या उंची वाढीच्या विरोधात केंद्र सरकारला पत्र पाठवायची मोहीम राबविली आहे. गेल्या चार वर्षांपासून आंदोलन अंकुश संघटना प्रत्येक वर्षी पूर परिषद घेऊन अलमट्टी धरणचं महापुराला कारणीभूत आहे, हे पुराव्यानीशी सांगत आहे. येणारा महापूर हा मानवनिर्मित असून योग्य नियोजनाने महापूर टाळता येऊ शकतो, हे सांगत आहे. प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु यावर्षी त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. त्यामुळेच सर्व राजकीय पक्ष, संघटना एकत्र येऊन अलमट्टीच्या उंची वाढीला विरोध करताना दिसत आहेत. राजकीय पक्षांची ही भूमिका बघून 'देर आये, दुरुस्त आये...' ही म्हण लागू होताना दिसत आहे.
टिप्पणी पोस्ट करा