शिरोळ प्रतिनिधी :
हंगामाच्या तोंडावर मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर व साखर संचालक यांच्या उपस्थिती मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी साखरेला दर वाढले, तर दुसरा हप्ता देण्याची तयारी दाखवली होती.
हंगाम सुरु होताना बाजारात 3500 रुपये क्विंटलला असणारे दर, आज 3800 रुपये झाले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांना साखर निर्यातीचा कोटा मिळालेला आहे आणि निर्यात साखरेला सुद्धा चांगला दर मिळत असल्यामुळे, यातुन शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे आंदोलन अंकुश संघटने कडून करण्यात आली. निवेदनात पुढे म्हंटले आहे की,
वाढलेल्या साखर दराचा फायदा शेतकऱ्यांना दिला पाहिजे. कारण यावर्षी एकरी 10 टन उसाचे उत्पादन कमी मिळाले आहे. उत्पादन कमी, खर्च जादा आणि उसाची किंमत कमीत कमी मिळाल्यामुळे ऊस शेती तोट्यात गेली असून शेतकऱ्यांना अतिरिक्त दर मिळाल्याशिवाय ऊस शेती परवडणार नाही.
आपण बैठकीत कारखानंदारांनी मान्य केलेनुसार वाढलेल्या साखर दरातील, 300 रुपये दुसरा हप्ता म्हणून देण्याचे आदेश द्यावेत. अशी विनंती संघटने कडून करण्यात आली.
ऊसाचे गतवर्षीपेक्षा कमी उत्पादन :
३ फेब्रुवारीपर्यंत, राज्यभरातील साखर कारखान्यांनी ६४४.७६ लाख टन ऊस गाळप केला आहे, जो गेल्या हंगामात याच कालावधीत ७२४.४४ लाख टन गाळप होता. राज्याचा एकूण साखर पुनर्प्राप्ती दर ९.०९% आहे, जो मागील हंगामात याच कालावधीत प्राप्त झालेल्या ९.६५% दरापेक्षा कमी आहे.
महाराष्ट्रात चालू २०२४-२५ हंगामात साखर उत्पादन ५८६.०८ लाख क्विंटल (अंदाजे ५८.६० लाख टन) पर्यंत पोहोचले आहे, जे गेल्या हंगामात याच कालावधीत उत्पादित झालेल्या ६९८.९४ लाख क्विंटलपेक्षा कमी आहे.कोल्हापूर विभागात ४० कार्यरत कारखाने (२६ सहकारी आणि १४ खाजगी) आहेत, त्यांनी १५७.१७ लाख टन ऊस गाळप केले आहे, ज्यातून १६८.९९ लाख क्विंटल साखर उत्पादन मिळाले आहे. या विभागात राज्यातील सर्वाधिक १०.७५% ऊस उतारा दर नोंदवला गेला आहे.
यावेळी आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे,तालुका अध्यक्ष दिपक पाटील, नागेश काळे, दत्तात्रय जगदाळे, युनूस शेख हे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा