शिरोळ नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे यांना तात्काळ निलंबित करा : अक्षय पाटील





 शिरोळ प्रतिनिधी : मंगेश नलावडे



शिरोळ नगरपरिषदेला सध्या कोणीही वाली नसल्यासारखी परिस्थिती झाली आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात असमर्थ ठरल्यामुळे मोठ्या सुट्टीवर गेले आहेत. प्रभारी मुख्याधिकारी कधी येतात, कधी जातात हे कुणालाही समजत नाही. यामुळे शिरोळ नगरपरिषदेतील अधिकारी कर्मचारी नगरपरिषदेचे मालक असल्यासारखे नागरिकांना वागणूक देत आहेत. कधीही यावे, काहीही करावे, कितीही पैसे खावे. आपल्याला कोण विचारायचा संबंध नाही, अश्या तोर्‍यात सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग वावरत आहे. 



प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे यांना निलंबित करा .. नगरविकास मंत्र्यांच्याकडे अक्षय पाटील यांची मागणी...



मुख्याधिकारी उपस्थित नसल्यावर जबाबदारी असलेले प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत. नागरिकांच्या बरोबर अरेरावीची भाषा बोलणार्‍या आणि आपल्या कर्तव्यात अक्षम्य कसूरी करणार्‍या या अधिकार्‍याला तत्काळ निलंबित करा. अशी मागणी आंदोलन अंकुश शिरोळ चे अध्यक्ष श्री.अक्षय पाटील यांनी नगरविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी कोल्हापूर व मुख्याधिकारी शिरोळ यांचेकडे केली निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की,



लक्ष्मण लोंढे यांची नागरिकांसोबत बोलण्याची पद्धत अतिशय खालच्या पातळीची आहे. नागरिकांच्या समस्यांना कधीही व्यवस्थित उत्तर न देता, उलट नागरीकांनाच दादागिरीची भाषा बोलून, तू आत कोणाला विचारून आला आहेस...? तुला ऊत्तर देण्यास मी बांधील नाही...? अश्याप्रकारची अरेरावीची भाषा ते सतत वापरत असतात.





मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असताना, हे अधिकारी राहायला आपापल्या गावात... शासनाचे घरभाडे खिशात ... कामाची वेळ सकाळी 9:45 आणि कामावर येतात 11 ला...



हे लोकसेवक मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे, हे नियमांनुसार बंधनकारक असताना सेवेच्या ठिकाणी राहत नाहीत, सध्या ते सांगली या ठिकाणी आपल्या घरीच राहत असून, शासनाकडून घरभाडे घेऊन शासनाची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यालयात राहणे बंधनकारक करून व एवढेदिवस घरभाडे घेऊन शासनाची फसवणूक केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा.

 


त्याचबरोबर सकाळी 9:45 ही कार्यालयात काम चालू करण्याची वेळ असताना, ते कधीही वेळेवर येत नाहीत. दररोज सदर कर्मचारी 10:30 ते 11 च्या दरम्यान येत असतात. त्यामुळे यांना वेळेत उपस्थित राहण्यास ताकीद द्यावी व याबाबत त्यांची चौकशी होऊन कारवाई व्हावी.

 


बायोमेट्रिक हजेरी नसल्यामुळे ..  हजेरी वहीवर... त्यामुळे आवो जावो घर तुम्हारा अशी परिस्थिती... ओळखपत्र गळ्यात घालायला वाटते लाज...



प्रशासकीय अधिकारी म्हणून नगरपरिषद मधील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने त्यांनी कधीच घेतली नाही, मशीन नादुरुस्त आहे हे ठरलेले उत्तर देत आहेत. याचेकारण ते स्वतःच कधीही वेळेवर येत नाहीत. आपली चोरी पकडली जाऊ नये,त्यामुळे ते बायोमेट्रिक हजेरी घेत नाहीत. सदर अधिकारी कधीही ओळखपत्र गळ्यात घालत नाहीत. आपण लोकसेवक आहे ,हे ते विसरले असून,  मी मालक आहे  अशी त्यांची वागणूक आहे.

 


नवीन नळ कनेक्शन देताना यांनी देखील पैसे खाल्ले असल्याच्या संशय...


नगरपरिषद मध्ये मागील महिन्यात झालेला नवीन नळ कनेक्शन परस्पर देऊन जो आर्थिक घोटाळा झाला, त्यात देखील यांचा सहभाग असल्याच्या आमचा संशय आहे. याचे कारण असे की, सदर घोटाळ्याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी जी चौकशी समिती नेमली गेली आहे, त्याचे लक्ष्मण लोंढे हे अध्यक्ष आहेत. परंतू हे अध्यक्ष कधीही चौकशी साठी बाहेर पडत नाहीत. सतत टाळाटाळ करीत आहेत. सदर घोटाळा बाहेर येऊन स्वताहाचे नाव यात येऊ नये, यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.


तरी सदर अधिकार्‍याची सखोल चौकशी व्हावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे.

 






Post a Comment

थोडे नवीन जरा जुने