शिरोळ प्रतिनिधी : मंगेश नलावडे
शिरोळ शहरासाठी 25 कोटी रुपयांची नवीन नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. या योजनेतील अंतर्गत पाईप लाईन टाकण्याचे काम करत असताना परस्पर चावी कनेक्शन देऊन प्रत्येकी 1700 रुपये घेतले गेले आहेत व ते पैसे नगरपरिषद मध्ये जमा न करता, सर्वांनी वाटून घेऊन मोठा घोटाळा झाला असून, यात सामील अधिकारी, कर्मचारी ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी केली असल्याचे आंदोलन अंकुश चे शहराध्यक्ष अक्षय पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे. तसेच सोमवार दिनांक 07 एप्रिल पर्यंत कारवाई न झाल्यास शिरोळ नगरपरिषद समोर उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
अक्षय पाटील पुढे म्हणाले की, नवीन पाईप लाईन टाकताना ज्यांचे जुने कनेक्शन आहे, त्यांचेच फक्त नवीन लाईन मध्ये कनेक्शन काढून ठेवायचे होते. पण पाणी पुरवठा अधिकारी कर्मचारी व ठेकेदार यांनी ही कनेक्शन सोडून नवीन कनेक्शन 1700 रुपये घेऊन परस्पर दिली व हे घेतलेले पैसे पण नगरपरिषद मध्ये त्या त्या वेळी जमा केलेले नाहीत.
अशा नवीन हजारो बोगस नळ कनेक्शनची कोणतीही नोंद नगरपरिषद मध्ये न करताच, ही कनेक्शन कशी दिली गेलेली आहेत....? 1700 रुपये का घेतले गेले...? व घेतलेले पैसे कोणत्या ठरावाच्या आधारे व कोणाच्या सांगण्यावरून घेतले....? या सर्वांचा खुलासा होणे गरजेचे आहे.
शिरोळ शहरात आधीच चार दिवसाआड पाणी दिले जात आहे. त्यात अशी विना नोंद नळ कनेक्शन देऊन नवीन योजना पण कुचकामी ठरणार असल्यामुळे यावर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.
अधिकारी, कर्मचारी यांना नोटीस :
हा घोटाळा निदर्शनास आल्यावर तोंडी तक्रार केली असता, लिपीक मल्लिकार्जुन बल्लारी, विनायक लोंढे, फिटर विश्वास कर्नाळे यांना नवीन पाणीपुरवठा योजनेतील नळ कनेक्शन चे अनामत नगरपरिषद मध्ये जमा न केले बाबत दिनांक 27 मार्च रोजी नोटीस बजावलेली आहे. आत्ता त्यातील काही पैसे यात सामील असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी नगरपरिषद मध्ये जमा केले आहेत.
तरीही अनेक कनेक्शन चे पैसे या भ्रष्ट साखळीने हडप करून गावाची आणि नगरपरिषद ची फसवणूक केली असून, यात सामील अधिकारी कर्मचारी आणि पाणी पुरवठा ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई मुख्याधिकारी यांनी करावी अशी आंदोलन अंकुश संघटनेकडून मागणी करण्यात आलेली आहे.
संबधितांच्यावर कारवाई व ठेकेदारचे काम तत्काळ थांबवावे :
आज पासून यात सामील लोकांना कामावरून बाजूला करावे व ठेकेदारास अंतर्गत पाईप लाईन चे काम बंद ठेवण्यास सांगावे. तसेच मुख्याधिकारी यांनी यात सामील अधिकारी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवावा व यात मी सामील नाही, हे कृतीतून दाखवून द्यावे. अन्यथा मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून सोमवारी आम्ही उपोषणास बसू असा निर्वानीचा इशारा आंदोलन अंकुश च्या शिरोळ शाखेने दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा