वीर जवान तुझे सलाम... शिरोळ गावचे सुपुत्र शहीद जवान सूरज पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूनयनांनी दिला अखेरचा निरोप : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार





शिरोळ प्रतिनिधी : 


भारतात जय जवान - जय किसान चा नारा नेहमी दिला जातो. कारण भारत देशातली जनता घेते तो श्वास आणि खाते तो घास या दोन घटकांमुळेच. त्यामुळे भारतात या दोन घटकांना अनन्यसाधारण महत्व आहे. जवान सीमेवर लढत आहेत म्हणूनच इथली जनता सुखाची झोप घेऊ शकते, आणि अशा या  भारतमातेच रक्षण करत असताना शिरोळ येथील अग्नीवीर सूरज भारत पाटील यांना उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे बॉम्बे इंजीनियर बटालियन मध्ये सेवेत असताना शनिवारी कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. देशाची सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले.  





सूरज भारतीय सैन्यदलात दाखल होऊन फक्त वर्ष-दोन वर्षे झाली होती. आज सकाळी त्यांचे पार्थिव पहिल्यांदा शिरोळ पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घरी नेण्यात आले. आपल्या तरुण मुलाचा मृतदेह बघून नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर मधून शिरोळ गावच्या मुख्य रस्त्यांवरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यदर्शनासाठी संपूर्ण शिरोळ गाव रस्त्यावर उतरले होते, मुख्य मार्गावर रांगोळी काढून सर्व शिरोळ करांनी आपले व्यवहार बंद ठेवून शहीद सूरज पाटील यांच्या अंत्ययात्रेत सहभाग नोंदवला. आज संपूर्ण दिवस शिरोळ गावचे संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. शिरोळ व परिसरातील हजारो नागरिक, लहान मुले, महिला साश्रूनयनांनी या अंत्ययात्रेत सहभागी झाले. 


सूरज पाटील यांना भागातील सर्व लोकप्रतिनिधी, भारतीय सैन्यदलातील माजी सैनिक संघटना, प्रशासकीय अधिकारी, तसेच विविध सेवाभावी  संघटना व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

     

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने