औरवाड प्रतिनिधी : प्रा.चिदानंद अळोळी
प.पू.संतशिरोमणी आचार्यश्री 108 विद्यासागरजी महामुनिराजजींच्या प्रथम समाधी स्मृती महोत्सवाच्या निमित्ताने आदरणीय बा.ब्र.तात्या भैय्याजींच्या संकल्पनेतून शांति विद्या ज्ञानसंवर्धन संस्थेच्या वतीने बनवण्यात आलेल्या आचार्यश्रींच्या प्रतिमेच्या रथ प्रवर्तनाचा शुभारंभ रविवार दि.2/2/2025 रोजी सदलगा येथून झाले.
सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी औरवाड येथे भक्तीमय वातावरणामध्ये गुरुभक्ती करत श्रावक श्राविकांनी आचार्यश्रींच्या रथाचे स्वागत व दर्शन घेतले. यावेळी सर्व श्रावक श्रावकांनी गुरुभक्ती करत आलेला रथ संपूर्ण गावातून फिरवण्यात आला.
साक्षात आचार्यश्रींचे समवशरणच गावागावातून प्रवर्तन होत असल्यासारखे दृश्य औरवाड येथे पाहायला मिळाले. आचार्यश्री आपल्या भागात साक्षात जरी आले नसले, तरी शांति विद्या ज्ञानसंवर्धन संस्थेने त्यांची हुबेहूब प्रतिमा बनवून परोक्ष रुपाने आचार्यश्रींचा विहारच प्रत्येक गावामधून करवून आपली अधूरी राहिलेली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयास या निमित्ताने केलेला आहे.
ज्या गावांमधून हे रथ प्रवर्तन होईल तेथिल समाजबांधवांनी अत्यंत उत्साहात गावामधून रथाची शोभायात्रा काढून, हा दिवस गुरु उपकार दिवस म्हणून साजरा करत आहेत.या निमित्ताने औरवाड मधील मोठ्या संख्येने श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🏵️ जाणून घेऊया आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांच्या बद्दल 🏵️
10 ऑक्टोबर 1946 रोजी शरद पौर्णिमेला कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील सदलगा येथे विद्याधर म्हणून जन्म झाला. त्यांचे वडील श्री मल्लप्पा हे नंतर मुनी मल्लीसागर झाले. त्यांची आई श्रीमंती होती जी नंतर आर्यिका समयमती झाली. 30 जून 1968 रोजी वयाच्या 22 व्या वर्षी अजमेर येथे आचार्य विद्यासागरजीनी दीक्षा घेतली,आयुष्यभर मीठ-साखर, हिरव्या भाज्या, दूध-दही खाल्लं नाही, दिवसातून एकदाच पाणी प्यायचे. त्यांची कठोर तपश्चर्या पाहून आचार्यश्री ज्ञानसागरजी महाराजांनी त्यांच्यावर आचार्यपदाची जबाबदारी सोपवली होती.
सुरुवातीपासूनच त्यांनी कठोर तपश्चर्या केली. त्यांनी संन्यास घेऊन दूध, दही, हिरव्या भाज्या आणि सुकामेवाचा त्याग केला होता. सन्यासानंतर त्यांनी या गोष्टी कधीच स्वीकारल्या नाहीत. तेही दिवसातून एकदाच ओंजळ भरून पाणी प्यायचे. ते पुन्हा पुन्हा पाणीदेखील पीत नव्हते. ते साधी डाळ आणि पोळी फार मर्यादित प्रमाणात खात असत. त्यांनी देशभर पायी प्रवासदेखील केला.
संत श्री विद्यासागर जी यांच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी...
- संपूर्ण कुटुंब सन्यासी झाले
विद्यासागर जी यांचे मोठे बंधू आता मुनी उत्तम सागर जी आहेत. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण सन्यासी झाले आहेत. त्यांचे भाऊ अनंतनाथ आणि शांतीनाथ यांनी आचार्य विद्यासागर जी यांच्याकडून दीक्षा घेतली आणि त्यांना मुनी योगसागर जी आणि मुनी समयसागर जी म्हणून ओळखले जाते. आई-वडीलही सन्यासी झाले आहेत.
- ना बँक खाते, ना ट्रस्ट
आचार्य विद्यासागर यांनी कधीही कोणाकडून पैसे घेतले नाहीत. ते संपत्ती जमा करण्याच्या विरोधात होते. त्यांनी कधीही त्यांच्या नावावर कोणतेही बँक खाते उघडले नाही. ते कधीही दक्षिणा किंवा दानधर्मातही पैसे घेत नव्हते. त्यांना जवळून ओळखणारे लोक असा दावा करतात की, त्यांनी कधीही पैशाला हात लावला नाही. जेव्हा लोक त्यांच्या नावावर पैसे दान करायचे, तेव्हा ते समाजसेवेसाठी दान करायचे.
टिप्पणी पोस्ट करा