दानोळी - निमशिरगांव रस्त्याच्या कामासाठी दानोळी मध्ये आमरण उपोषण सुरू ...




दानोळी प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क



एकीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी साहेब हजारो कोटी रुपये खर्च करून नव नवीन रस्त्यांचे प्रोजेक्ट उभे करीत आहेत. परंतू शिरोळ तालुक्यातील दानोळी मध्ये मात्र पाईपलाईन च्या कामावेळी खराब झालेली साईड्पट्टी दुरुस्त करावी, म्हणून सामान्य नागरिकांना उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. गलेलठ्ठ पगार देऊन, ज्या कामासाठी अधिकार्‍यांची नेमणूक केली जाते, तेच काम व्यवस्थित न केल्यामुळे आंदोलन अंकुश संघटनेसारख्या सामाजिक संघटनांना आपला कामधंदा सोडून सामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी लढण्याची वेळ आलेली आहे. 



दानोळी - निमशिरगांव मजबूत रस्त्याची साईड पट्टी उकरून वारणा नदीतून तारदाळ गावाला जलवाहिनी गेली आहे. जलवाहिनी चे काम पूर्ण झाल्यावर मात्र ठेकेदाराने साईड पट्टी चे काम दर्जाहीन केले. नुसता साईडपट्टीला माती टाकून सोडून दिले. त्याचबरोबर जलवाहिनीची खुदाई करताना मोरी चे देखील नुकसान केले आहे. रोलिंग न करता फक्त माती टाकल्यामुळे रस्त्याच्या कडेला मोठे मोठे खड्डे आता पडले आहेत व त्यामुळे सदर रस्त्याला अपघाताचे प्रमाण वाढले आहे.






यासंदर्भात आंदोलन अंकुश शाखा दानोळी यांचेवतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देण्यात आलेले होते, साधारण 2 महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर चे उपभियंता सूर्यवंशी साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून लवकरात लवकर काम करून देण्याचे आश्वासन दिलेले होते. परंतू आजपर्यंत काम झालेले नाही, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदाराला वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. म्हणून 26 मे रोजी आंदोलन अंकुश संघटनेकडून पुन्हा पत्रव्यवहार करून बुधवार दिनांक 4 जून पासून आमरण उपोषनाचा ईशारा देण्यात आलेला होता. 



त्याप्रमाणे आज बुधवार दिनांक 4 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजलेपासून दानोळी येथील, आवाडे पार्क गेट जवळ, प्रकाश भोकरे यांच्या हद्दीलगत सार्वजनिक जागेत, रस्त्यालगत, वाहतुकीला अडचन होणार नाही, अश्या ठिकाणी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. उदय होगले, दानोळीचे सामाजिक कार्यकर्ते विजय दळवी, प्रमोद बाबर, अरविंद माने यांचे दानोळी गावातील ईतर सुजान  नागरिकांसह बेमुदत आमरण उपोषण सुरू झाले आहे. 







आंदोलन स्थळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सूर्यवंशी साहेब, जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांनी आतापर्यंत भेट दिलेले आहेत. पण आंदोलन थांबविण्यास त्यांना अजून यश आलेले नाही.



आंदोलनाच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे : 


1) सदर रस्त्यावर पाईपलाईन टाकण्यास घेतलेला परवान्याच्या अटींचा भंग करून ठेकेदार खुदाई करत आहे. त्यामुळे ते काम तात्काळ थांबवण्याचे लेखी आदेश व्हावेत.


2) यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेला आदेश न जुमानता खुदाई करणाऱ्या ठेकेदारावर पोलीस कार्यवाही करावी व खुदाई साठी वापरलेले वाहन जप्त करावे.


3) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या हलगर्जीपणाबद्दल वरिष्ठांकडे अहवाल पाठवावा.


4) सदर टक्केदारांनी आपल्या हद्दीतील अनेक ठिकाणी बाजू पट्टी खुदाई करून पाईप घातले आहे त्या ठिकाणी पक्की बाजू पट्टी होत नाही तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या कामाला स्थगिती द्यावी. 


5) दानोळी ते निमशिरगाव दरम्यान रस्त्यावर असणारे दोन दगडी पूल व एक मोहरीचे नुकसान ठेकेदाराने केलेले आहे. त्याचा पंचनामा व्हावा व झालेले नुकसान भरपाई वसूल करावी. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने