भारत माता की जय...!!
दहशतवादाला खत पाणी घालणाऱ्या पाकिस्तानात घुसून भारताचे " ऑपरेशन सिंदूर..."
प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 20 हून अधिक पर्यटकांसह एकूण 26 जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी घडवून आणल्याचा ठोस पुरावा भारताकडे होता. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला. पाकिस्तानवर भारत लवकरच हल्ला करू शकते, अशी माहिती आपल्याकडे असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. याचे प्रत्युत्तर भारत देणार हे संपूर्ण जगाला माहिती होते. त्याचा मुहूर्थ आज होता.
भारतीय लष्कराने "ऑपरेशन सिंदूर" या नावाने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई करत, आज बुधवारी 7 मे रोजी मध्यरात्री 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला आहे. आज मध्यरात्री 1.30 वाजता भारताने हा हल्ला केला आहे. भारतीय हवाई दलाने बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद यासह 9 दहशतवादी ठिकाणांवर 24 हल्ले केले. यात 50 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, हे सर्व हल्ले भारताने आपल्या हवाई हद्दीतूनच केले. या कारवाईत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, परंतु कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना हात लावण्यात आला नाही, असे भारत सरकारने स्पष्ट केले.
पाकिस्तान या हल्ल्यानंतर बिथरला आहे. सीमेवर सीजफायरचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे. सियालकोट आणि लाहोर एअरपोर्ट 48 तासांसाठी बंद करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये इमार्जन्सी घोषित करण्यात आली आहे. तर पाकिस्तानने सकाळी 10 वाजता एक महत्वाची बैठक बोलावली आहे.
भारत सरकार आणि सुरक्षा दलांनी पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली होती. मात्र लष्करी कारवाई कधी होणार अशी चर्चा सुरू होती. आज देशभरात 244 ठिकाणी मॉकड्रिल करण्यात येणार होते. मात्र ते करण्याआधीच भारताने एअर स्ट्राईक करून पहालगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे.
टिप्पणी पोस्ट करा