युवा आंदोलकाचे भर उन्हाळ्यात गावासाठी उपोषण....नगरपरिषद अधिकारी मात्र दोषींना वाचवण्याच्या प्रयत्नात...
शिरोळ प्रतिनिधी :
शिरोळ नगर परिषदेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेमध्ये नागरिकांचे कोणतेही अर्ज न घेता, बोगस पद्धतीने, पैसे हडप करण्याच्या उद्देशाने हजारो नवीन नळ कनेक्शन 1700 रुपये भरून घेऊन, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर जोडून दिले गेले आहेत. याप्रकरणी नगरपरिषदेचे दोन लिपिक निलंबित झाले आहेत.
सदर आर्थिक घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटनेचे अक्षय पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आज सोमवार दिनांक 7 एप्रिल सकाळी 11 वाजले पासून नगर परिषदेच्या दारातच अक्षय पाटील बेमुदत उपोषणास बसले आहेत.
दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न :
नवीन नळ कनेक्शन आर्थिक घोटाळा प्रकरण बऱ्याच अधिकाऱ्यांच्या अंगलट येणार, हे जाणवल्यामुळे पुढील सखोल चौकशीमध्ये टाळाटाळ केली जात असल्याचे मत आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी व्यक्त केले.
दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले म्हणजे हे प्रकरण थांबले नाही. यामध्ये सखोल चौकशी व्हावी, यासाठी आंदोलन अंकुश संघटने कडून नगरपरिषदचे अधिकारी व नागरिक यांची चौकशी समिती नेमावी व त्या आधारे केवढा मोठा घोटाळा झाला आहे याचा निष्कर्ष काढावा, अशी मागणी करण्यात आली होती. परंतू चौकशी समितीमध्ये नागरिकांना घेण्यास प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला. ही सर्व व्यवस्था सर्वसामान्य नागरिकांच्या साठीच असताना नागरिकांना चौकशी समितीमध्ये घेण्यास काय अडचण आहे...? मोठा घोटाळा समोर येऊन आपल्या अधिकाऱ्यांना वाचविण्याचा हा प्रयत्न आहे. असे परखड मत धनाजी चुडमुंगे यांनी मांडले.
चौकशी समितीमध्ये फक्त नगरपरीषदेचे अधिकारी घेतल्यास, घोटाळा कधीच समोर येणार नाही. त्यामुळे चौकशी समितीमध्ये नागरिकांना घेतल्याशिवाय उपोषण थांबणार नाही. असे युवा आंदोलक अक्षय पाटील म्हणाले.
पाणीपुरवठ्याचे विभाग प्रमुख अमन मोमीन अजून कामावर येतात कसे...?
ज्या पाणीपुरवठा विभागामध्ये नवीन नळ कनेक्शन साठी पैसे घेण्यात आले. त्या विभागाचे प्रमुख अमन मोमीन अजूनही कामावर येत आहेत. कर्मचाऱ्यांना तोंडाला देऊन आपण आता सुटलो... अशा अविर्भावात ते मिरवत आहेत. परंतु कर्मचाऱ्यांच्या कडून 1700 रुपये नळ कनेक्शन साठी मागणी झाल्यानंतर काही जागरूक नागरिकांनी विभाग प्रमुख म्हणून मोमीन यांना याबाबत विचारणा केली असता, नवीन नळ कनेक्शन साठी तेवढे पैसे द्यावेच लागतील असे त्यांच्याकडून सुद्धा सांगण्यात आले आहे. याचा अर्थ ते देखील या घोटाळ्यात सामील आहेत. हे सिद्ध होते. असे नागरिक पोलीस स्टेशनला जबाब देण्यासाठी जाणार असल्याचे समजते.
टिप्पणी पोस्ट करा