तो रस्ता तात्काळ न केल्यास शिरोळ नगरपरिषदेवर 25 फेब्रुवारी रोजी धडक मोर्चा....



शिरोळ प्रतिनिधी : 


         खासदार बाळासाहेब माने विकास महामंडळ ते क्रांती चौक पर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती २५ फेब्रुवारी पर्यंत न केल्यास नगरपरिषदेवरती धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रभाग क्रमांक 3, 4 व 5 मधील नागरी हक्क कृती समितीच्या वतीने मंगळवारी निवेदनाद्वारे दिला आहे. या संदर्भात नगरपरिषदेचे अभियंता लक्ष्मण लोंढे यांना सोमवारी नागरीहक्क कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.


      सुमारे वीस वर्षांपूर्वी माजी आमदार स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांनी, शासनाच्या  निधीतून हा रस्ता केला होता. त्यानंतर  या रस्त्यावरती तात्कालीन ग्रामपंचायत अथवा गेल्या  सात वर्षात नगरपरिषदेने कोणतीही  डागडूजी न केल्याने हा रस्ता खड्डामय झाला आहे. दुचाकी वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना अनेक समस्या निर्माण होऊन अपघात झाले आहेत. नागरिकांना मणक्याचे आजार निर्माण झाले आहेत तसेच रस्त्यावरती धुळीचे साम्राज्य असल्याने परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार होत आहेत. हा रस्ता कोणाच्या मालकीचा....?  हे कारण नगरपरिषदेने न सांगता परिसरातील नागरिकांचे आरोग्य व हित पाहून आणि परिसरातील नागरिकांना येण्या जाण्याकरता  मुख्य रस्ता असल्याने, या रस्त्याची डागडुजी तसेच डांबरीकरण करण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा अन्यथा 25 फेब्रुवारी रोजी नगर परिषदेवरती धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.


      यावेळी नागरी हक्क कृती समितीचे प्रमुख डी आर पाटील, दिगंबर सकट, अमरसिंह शिंदे, बाळासाहेब माळी, डॉ.दगडू माने, सुनील इनामदार, संदीप माने ,अशोक भोसले अमिन शेख, माणिकराव विटेकरी ,उत्तम कोळी दिलीप कोळी दीपक सूर्यवंशी, जमीर मुजावर संदीप भंडारे ,अल्लाउद्दीन गवंडी यांच्यासह 200 नागरिकांनी सह्याचे निवेदन दिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने