भाजी मंडई शिरोळ येथे महिला स्वच्छतागृहाची आवश्यकता : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांच्याकडे महिलांनी केली मागणी...

         महिलांनी स्वच्छता गृहासाठी मागणी केलेली जागा...





शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क 



शिरोळ मधील सर्व भाजी विक्रेत्या महिलांच्या कडून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर, जिल्हाधिकारीसो, कोल्हापूर व मुख्याधिकारी,शिरोळ यांना लेखी अर्जाद्वारे भाजी मंडई शिरोळ जवळ महिला स्वच्छतागृहाची तातडीने आवश्यकता असलेबाबत लेखी विनंती अर्ज करण्यात आला आहे.



अर्जामध्ये म्हटले आहे की, शिरोळ मधील भाजी मंडई हे ठिकाण मुख्य चौकामध्ये असून, सदर मंडईमध्ये रोज भाजी विक्रीचा बाजार भरत असतो. तसेच शनिवारी आठवडा बाजार देखील भरत असतो. बाजारात महिला बाजी विक्रेत्या महिला भाजी विकण्यासाठी, तसेच भाजी खरेदीसाठी महिला मोठ्या संख्येने शिरोळ व आसपासच्या परिसरातून येत असतात. रोज भाजी विक्रेत्या महिला दुपारी 3 ते 8 वाजेपर्यंत भाजी विक्री करत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून आमची मागणी आहे की, भाजी मंडई भागात महिला स्वच्छतागृह व्हावे. पण या मागणीकडे सर्वांनीच पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यामुळे महिलांना आरोग्याच्या बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.



आपणास विनंती आहे की, सद्यस्थितीत मंडई शेजारी पांढरी मशीद जवळ, पुरुष स्वच्छतागृह बांधण्यात येत आहे. त्यामध्येच लागून महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात यावे. म्हणजे भाजी विक्रेत्या महिला व भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या महिलांना सोयीस्कर होईल.



अर्जात पुढे म्हटले आहे की, आपणास विनंती अर्ज करताना इतके दुःख होत आहे की, महिलांना स्वच्छतागृह नसल्याने..  भाजीविक्रेत्या महिला दुपारी भाजी विकण्यासाठी आले पासून, पाणी पिणे पूर्णपणे टाळतात. जेणेकरून त्यांना स्वच्छतागृहाचा वापर करावा लागू नये..  ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे. आपण याचा गांभीर्याने विचार करावा व तात्काळ यावर निर्णय घ्यावा. सदरी विनंती अर्जावर 20 भाजी विक्रेत्या  महिलांच्या सह्या आहेत.



महिलांच्या भावना लक्ष्यात घेऊन, सदर विनंती अर्ज, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर व जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांना आंदोलन अंकुश चे नेते श्री. राकेश जगदाळे यांनी स्वतःच्या ईमेल आयडी वरून मेल केला आहे. त्यांना सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील व अभ्यासू युवा वक्ते प्रदीप खाडे यांचे सहकार्य लाभले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने