शिरोळ प्रतिनिधी :
शिरोळ नगरपरिषदेच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी नगरपरिषदेच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच नगरपरिषदेच्यावतीने शिरोळ भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख, खरे सामाजिक कार्य काय असते, हे गेली 20 वर्षे आपल्या कामातून दाखवून देणारे, क्रांतिकारी विचारांचा माणूस म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारे शिरोळ गावचे सुपुत्र मा.श्री.धनाजी चुडमुंगे यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी दिली आहे.
शिरोळ भूषण पुरस्कार योग्य व्यक्तीला दिल्याबद्दल शिरोळ नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांचे देखील पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.
शिरोळ नगरपरिषदेच्या वर्धापनदिनी उद्या होणार विविध कार्यक्रम :
शिरोळ नगरपरिषदेच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त नगरपालिकेच्या कार्यालयात सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. शिरोळ नगरपरिषद व डॉ. सुधाकर जाधव हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री शाहू कुमार विद्यामंदिर शिरोळ येथे गुरुवारी सकाळी १० ते १२ या वेळेत आणि छत्रपती विद्या मंदिर शिरोळ येथे दुपारी १२ ते २ या वेळेत लहान मुलांच्या शस्त्रक्रियाची मोफत तपासणी करून आवश्यक असल्यास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सायंकाळी ६ वाजता येथील छत्रपती शिवाजी चौकात माझी मायबोली राधानगरी प्रस्तुत गाथा महाराष्ट्राची हा साथ मराठमोळ्या मनाला असा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात मा.श्री.धनाजी चुडमुंगे यांना नगरपरिषदेच्यावतीने शिरोळ भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तरी शिरोळकर नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित रहावे. असे आवाहन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा