शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार आणि जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे करण्यात आलेली हिंदूंची हत्या याच्या निषेधार्थ व दोषींवर त्वरित कठोर कारवाई व्हावी, याकरिता आज मंगळवार दि. 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शिरोळ तहसीलदार यांना श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांचेकडून निवेदन देण्यात आले.
तत्पूर्वी पंचायत समिती, शिरोळ आवारातील शिवतीर्थावर विभागातील धारकरी व हिंदू युवकांनी मोठ्या प्रमाणात जमून, छत्रपती शिवरायांना वंदन करून, हार अर्पण केला. त्यानंतर ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र म्हणून तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेधच्या घोषणा देत चालत मोर्चा काढण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या लोकसभेने वक्फ बोर्ड सुधारणा कायदा 2025 बहुमताने संमत केला व त्याचे कायद्यात रूपांतर झाले. सदर कायद्याला विरोध म्हणून मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद येथे कुठल्याही सनदशीर मार्गाचा अवलंब न करता तेथील घुसखोर व दंगेखोरांनी दंगे भडकविले आहेत. यानिमित्ताने तेथे अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या जाणूनबुजून घडविल्या गेल्या आहेत. लुटालुट, जाळपोळ, दगडफेक, सैन्य दलावर हल्ले असे प्रकार तेथे राजरोसपणे सुरू आहेत.
हिंदूंच्या मालमत्तेची हानी व हिंदू प्रार्थनास्थळांची, हिंदू महिलांची विटंबना, तसेच निवडून निवडून केवळ हिंदूंची घरे, दुकाने व वाहने जाळण्याच्या भयंकर प्रकरणांची, विचलित करणारी दृश्य समाज माध्यमांवर सर्व देशाने पाहिले आहेत. तेथील हिंदूंवर, त्यांच्या मंदिरांवर, त्यांच्या बालकांवर, त्यांच्या स्त्रियांवर हल्ले करून, त्यांना आपले घरदार सोडून तेथून पलायन करण्यास भाग पाडले जात आहे. हे सर्व खूप भयंकर आहे. खरे तर हा हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वावर घातलेला घाला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर तेथील राज्य सरकार दंगलखोरांना नियंत्रित करण्याबाबत पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी तेथील राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. कायदा व सुव्यवस्था हा प्रत्येक राज्य शासनाच्या अखत्यारीतील भाग असून, सदर राज्य सरकार संविधानाची मूलतत्त्वे राखण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचे व मुर्शिदाबाद येथील अल्पसंख्यांक हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी, केंद्र सरकारने लक्ष घालून पश्चिम बंगाल येथील राज्य शासन तातडीने बरखास्त करावे. तेथे त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करावी. अशी मागणी आज आम्ही करत आहोत.
त्याचबरोबर पहलगाम येथील एक-दोन नव्हे, तर तब्बल 28 हिंदू पर्यटकांना जाणीवपूर्वक लक्ष करून त्यांचा धर्म विचारून, अत्यंत क्रूर पद्धतीने मारण्यात आले आहे. तसेच अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. सदरचा क्रूर हल्ला हा केवळ पर्यटकांवरचा नसून, प्रत्येक भारतीयांवरचा हल्ला आहे. तरी याबाबत देखील केंद्र सरकारने विशेष लक्ष घालून यातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई विनाविलंब करावी.
यावेळी श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई, शिरोळ तालुका कार्यवाहक श्री. प्रवीण चुडमुंगे यांच्याबरोबर मोठ्या संख्येने धारकरी व हिंदू युवक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा