शिरोळ प्रतिनिधी :
"एकदा एखाद्या खाजगी जागेवर शासनाचे आरक्षण पडले, तर शक्यतो ते आरक्षण निघत नाही." अशी सर्वत्र चर्चा असताना आंदोलन अंकुश संघटनेने अभ्यासपूर्ण लढा देऊन शिरोळ शहराच्या विकास आराखड्यातील 99 % खाजगी जागांवरील आरक्षण काढून दाखविले आणि महाराष्ट्रात इतिहास घडविला.
शिरोळ शहारासाठीचा विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर, शेतकरी तसेच परिसरातील नागरिक यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. जवळपास 450 नागरिक, शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षणे टाकली आहेत. ही बाब ज्यावेळी आंदोलन अंकुशच्या लक्षात आली, त्यावेळी आंदोलन अंकुश संघटनेने यात लक्ष घालण्याचे ठरवले आणि आज शिरोळ शहरातील 99% खाजगी जागांवरील आरक्षणे निघाली आहेत. अशी माहिती आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख श्री.धनाजी चुडमुंगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
धनाजी चुडमुंगे म्हणाले, प्रत्येक वेळी शिरोळ व शिरोळकर नागरिकांवर आलेल्या संकटांना छातीची ढाल करून संघटना काम करत असते. पण विशेष म्हणजे या विकास आराखडा आरक्षण लढ्यामध्ये कोणतेही आंदोलन ,रस्ता रोको, न्यायालयीन लढाई व उपोषण न करता फक्त आणि फक्त डोक्याचा वापर करून, या प्रकरणाचा हा लढा यशस्वी करण्याचे ठरले. त्यानुसार अभ्यासू टीम तयार केली. नगरपरिषदेला प्रत्येक टेक्निकल बाबी निदर्शनास आणून दिल्या. वेळोवेळी लागणारी कागदपत्रे, पुरावे या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर पुरवठा केला आणि खाजगी जागेवरील सगळी आरक्षणे काढून ती सरकारी, गायरान व सार्वजनिक वापर असणाऱ्या जागेवर टाकायला लावली आणि महाराष्ट्रात एक आदर्श पद्धतीने कोणाचीही जमीन न घेता विकास आराखडा तयार करायला लावला आहे.
टाऊन प्लॅनिंग ने रिजनल प्लॅन मध्ये शिरोळ व परिसरात 2017 ला रस्त्याची आरक्षणे टाकली होती. ही रस्त्याची आरक्षणे कधीही निघाली नसती, पण आम्ही विकास आराखड्याच्या नावावर त्यातील बरेचसे रस्ते रद्द करून घेतले, अनेक रस्त्यांची रुंदी कमी करून घेतली व अनेक रस्त्यांची आलायमेन्ट चुकली होती, ती दुरुस्त करून घेतली. महाराष्ट्रात असं हे पहिल्यांदा घडलं आहे.
हा विकास आराखडा अंतिम करण्यासाठी नगरपरिषद लोकप्रतिनिधी, मुख्याधिकारी व नगरपरिषद प्रशासन, नगररचना विभाग यांचे सहकार्यातून आम्ही हा महाराष्ट्रात आदर्श असा विकास आराखडा तयार करून घेण्यात यशस्वी झालो आहोत. कोणताही गट -तट ,जात- पात धर्म या गोष्टीचा काडीमात्र विचार न करता जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्याला यश आले आहे.
हा विकास आराखडा पुढील 25 वर्ष लागू राहणार असल्यामुळे पुढचे 25 वर्ष तरी कोणाचीही जमीन शासन घेणार नाही त्यामुळे जे लोक राजकीय हेतूने प्रेरित होऊन या आराखड्याला रद्द करा म्हणत आहेत. त्यांना आमची विनंती आहे की, स्वार्थासाठी या आराखड्यास विरोध करून पुन्हा खाजगी जमिनी विकास आराखड्यात घालवण्याचे पाप करू नका अशी त्यांना नम्र पूर्वक विनंती. त्यातूनही त्यांनी हा आराखडा रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना लोकांनी मतदानातून अद्दल घडवावी अशी विनंती सर्वाना आहे.
या पत्रकार परिषदेस आंदोलन अंकुशचे प्रमुख श्री.धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, अमोल गावडे (सर), महेश जाधव, अक्षय पाटील, मारुती नंदीवले उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा